विद्यार्थ्यांनी भूगावला दिलं ‘अर्बन डिझाइन’

विद्यार्थ्यांनी बनविलेला भूगावचा आराखडा
विद्यार्थ्यांनी बनविलेला भूगावचा आराखडा

पुणे - शहरे फोफावू लागली की लगतच्या खेडेगावांकडे हा विस्तार सरकू लागतो. त्याचे योग्य नियोजन केले नाही, बकालपणा हा ठरलेलाच. पुण्याजवळचं भूगाव हे असंच विकसित होणारं गाव. त्याचा नियोजनबद्ध विकास व्हावा म्हणून या गावातलगतचं वास्तुकला महाविद्यालय पुढं आलं. त्यांनी गावच्या विकासाचा आराखडा तयार केला.

पिरंगुट येथील डॉ. वसंतदादा पाटील वास्तुकला महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी भूगावचा परिसर अभ्यासाचा विषय म्हणून निवडला. महाविद्यालयाच्या मार्गावरचं हे गाव. त्यांनी गावाची जीवनशैली, संस्कृती अभ्यासली. उद्योगव्यवसाय आणि बांधकामांसाठी विकली जाणारी गावची सुपीक जमीन, सतत वाढणाऱ्या गरजा, सुविधा यामुळे जीवनशैली सुधारत आहे. मात्र, पर्यावरण, नदी, संस्कृती, परंपरा या गोष्टींकडे होत असलेलं दुर्लक्ष, यामुळे उद्याचं भूगाव कसं असेल, याचा विचार करून त्यांनी गावाचं ‘अर्बन डिझाइन’ तयार करण्याचा निर्णय घेतला. 

उद्याच्या भूगावचा विचार करताना विद्यार्थ्यांनी त्यात सरपंच आणि ग्रामस्थांनाही सहभागी करून घेतले. पर्यावरण, दळणवळण, जीवनशैली, वास्तुशैली, भूगावची प्रतिमा आदी मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण आणि ग्रामस्थांच्या मुलाखती घेत आराखड्याला आकार दिला. भूगावचे वैशिष्ट्ये, समस्या यांचा अभ्यास आणि निष्कर्षावरून गावकऱ्यांच्या राहणीमानात कशी सुधारणा करता येईल, असा प्रस्ताव बनविण्यात आला. सहा महिने केलेला अभ्यास व त्यावरून बनविलेला प्रस्ताव भूगावकरांसमोर ठेवण्यात आला. त्यावर मते व प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि भूगावच्या परिसराची प्रतिकृती बनवण्यात आली.

आराखड्यातील वैशिष्ट्ये 
पादचारी मार्ग, वाहतूक नियंत्रणासाठी रस्ता रुंदीकरण, पर्यायी रस्त्यांना नव्या रस्त्यांची जोडणी, उड्डाण पूल, तसेच अन्य पायाभूत सुविधांबरोबर सार्वजनिक उद्याने, जलतरण तलाव, ग्रंथालय, चित्रपटगृहे, खेळण्याचे मैदान यांचा समावेश आराखड्यात आहे. शेतजमिनी, चराई क्षेत्र, वनक्षेत्र संरक्षित करून बाजारपेठा, वारकरी भवनाची उभारणीही विद्यार्थ्यांनी आराखड्यात मांडली आहे. 

योग्यवेळी योग्य नियोजन हवे!
वीरेंद्र बहल, अभिजित दुदुस्कर यांच्यासह ८२ विद्यार्थ्यांनी या प्रकल्पावर काम केले. प्राध्यापक प्रसन्न देसाई, संस्थेचे सचिव जितेंद्र पितळिया आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांनीदेखील या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुदुस्कर म्हणाला, ‘‘भूगावची प्रतिमा भरपूर रहदारी, अस्वच्छ राम नदी, असुरक्षित रस्ते, अशी बनत चालली आहे. गावाने एकत्र येऊन योग्यवेळी सुनियोजित आराखड्याचा विचार केला, तर भविष्यात नागरी समस्या निर्माण होणार नाहीत. तसेच, योग्यरीत्या विकासही होईल, हाच अभ्यासामागील हेतू होता.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com