विद्यार्थ्यांना मिळाल्या करिअरविषयक टिप्स

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

पुणे - ‘‘करिअरसाठी पालकांनी मुलांवर दबाव टाकू नये. त्यांचा कल जाणून घेऊन त्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअरची संधी द्यावी. त्यामुळे मुलांना हव्या त्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठता येईल आणि स्वबळावर केलेल्या करिअरचा आनंद त्यांच्यासाठी वेगळाच असेल,’’ असा सल्ला बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एन. रावळ यांनी शुक्रवारी पालकांना दिला.

पुणे - ‘‘करिअरसाठी पालकांनी मुलांवर दबाव टाकू नये. त्यांचा कल जाणून घेऊन त्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअरची संधी द्यावी. त्यामुळे मुलांना हव्या त्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठता येईल आणि स्वबळावर केलेल्या करिअरचा आनंद त्यांच्यासाठी वेगळाच असेल,’’ असा सल्ला बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एन. रावळ यांनी शुक्रवारी पालकांना दिला.

‘सकाळ प्रकाशन’तर्फे करिअरतज्ज्ञ डॉ. श्रीराम गीत यांच्या ‘करिअर मार्गदर्शक’ आणि इंजिनिअर हेमचंद्र शिंदे लिखित ‘प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शिका’ या पुस्तकांचे प्रकाशन डॉ. रावळ यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. रावळ यांनी पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

कार्यक्रमात डॉ. गीत यांचे ‘क्षमता वाढवून छानसे करिअर करण्यासाठी’ या विषयावर आणि शिंदे यांचे ‘बारावीनंतरची करिअर निवड आणि मेडिकल-इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया’ या विषयावर व्याख्यान झाले. ‘सकाळ प्रकाशन’चे सरव्यवस्थापक आशुतोष रामगीर या वेळी उपस्थित होते.
डॉ. गीत यांनी बारावीनंतर मुलांना पालकांनी करिअर निवडण्याची संधी द्यावी, असे सांगत विद्यार्थ्यांनीही स्वतःवर ठाम विश्‍वास ठेवावा, असे सांगितले. स्वतःचा मार्ग निवडा, प्रत्येक विषयाचा मन लावून अभ्यास करा, प्रत्येक विषयाची सखोल माहिती घ्या आणि त्यातील बारकावे जाणून घ्या, अशा टिप्सही त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.

शिंदे यांनी बारावीनंतरची करिअर निवड आणि मेडिकल-इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती दिली. बारावीतील गुणांवर प्रवेश मिळेल हा विचार सोडून विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षांकडे लक्ष द्यावे. सरकारी महाविद्यालयात दरवर्षी अनेक जागा उपलब्ध असतात. त्याचा विचार करूनच अभ्यासाची तयारी करावी. परीक्षांचे तंत्र समजून घ्या आणि त्यादृष्टीने तयारीला लागा, असे मार्गदर्शन शिंदे यांनी केले. ऐश्‍वर्या कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले.

वाणिज्य शाखेतही खूप संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेकडेही करिअर म्हणून पाहावे. विद्यार्थ्यांनी करिअरचा उत्कृष्ट पल्ला गाठण्यासाठी मेहनत आणि अभ्यास करावा. पालकांनीही मुलांना पाठिंबा द्यावा. 
- डॉ. सी. एन. रावळ, प्राचार्य, बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student career tips