#CivicIssues दाखल्यांसाठी दमछाक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

पुणे - दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्याने सर्वत्र प्रवेशाची गडबड आहे. त्यातच या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्‍यक असलेले दाखले मिळविण्याकरिता पालक आणि विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे ती नागरी सुविधा केंद्रांमधील कारभारामुळे. या केंद्रामधील अपुरे कर्मचारी आणि बेभरवशाच्या संगणकप्रणालीमुळे पालक आणि विद्यार्थ्यांना दाखले घेण्यासाठी तासनतास रांगेत ताटकळ राहावे लागत आहे. येथील कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने ऐन प्रवेशाच्या काळात विद्यार्थ्यांना चकरा माराव्या लागण्याची शक्‍यता आहे.

दहावी आणि बारावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विविध प्रकारचे दाखले बंधनकारक आहेत. त्यानुसार ऑनलाइन दाखले देण्याची व्यवस्था नागरी सुविधांमध्ये आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. दाखले ऑनलाइन स्वरुपात देण्यात येत असले तरी, त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विभाग करण्यात आले आहेत. त्यातून अर्जांची विक्री, तपासणी, स्वीकृती व दाखले वाटप करण्यात येत आहेत. या ठिकाणी सकाळपासूनच भल्यामोठ्या रांगा लागतात. "ऑनलाइन' यंत्रणा अनेकदा बंद पडत असल्याने येथे गोंधळ निर्माण होतो. ही यंत्रणा दुरुस्त करण्याकडे अधिकारी लक्ष देत नसल्याने गोंधळात भर पडत असल्याचे दिसून आले.

दाखल्यांसाठी "पोच पावती' "टोकन' देणारी यंत्रणा बंद असते. एखाद्या दाखल्यासाठी नेमकी काय कागदपत्रे (पुरावे) सादर करायची, याचीही माहिती कर्मचारी देत नसल्याने पालकांची अडचण होत आहे.

पालक स्मिता मोरे म्हणाल्या, 'इथे माहितीची सुयोग्य यंत्रणा नाही. एक कागद काढण्यासाठी वेगवेगळ्या खिडक्‍यांवर जावे लागते आहे. त्यात प्रचंड वेळ वाया जात असल्यामुळे मनस्ताप होत आहे.''

शासनाने ऑनलाईन सुरू केलेली प्रक्रिया कर्मचाऱ्यांना समजण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. पण काही दिवसांतच सर्व प्रक्रिया सुरळीत होईल, असे नागरी सुविधा केंद्राचे संपर्क अधिकारी (प्रभारी) संजय ढमाले यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट शाळांमध्ये उपलब्ध करणार आहोत. त्यासाठी प्रक्रिया शाळांच्या पातळीवर केली जाईल. त्यामुळे विद्यार्थांनी शाळांमध्ये अर्ज करायचा आहे. या काळात आणखी काही शाळांमध्ये ही योजना राबविण्याचे नियोजन आहे.
- प्रशांत पिसाळ, प्रमुख नागरी सुविधा केंद्र

नागरी सुविधा केंद्रांबाबत आपला अनुभव कसा आहे ? आम्हाला कळवा फेसबुक आणि ट्विटरवर नागरी सुविधा केंद्र.
#CivicIssues

Web Title: student certificate admission process parent student