विद्यार्थ्यांसाठी हव्यात ‘इनोव्हेशन लॅब’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

तज्ज्ञांच्या व्याख्यानांसाठी जागा द्याव्यात
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे संचालक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे म्हणाले, ‘‘तंत्र शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना संधी मिळावी म्हणून महाविद्यालये, संस्थांमध्ये नवसंशोधन आणि उद्योजकता विकास केंद्र सुरू व्हावीत. तसेच नव्या कल्पना विकसित करण्यासाठी ‘इनोव्हेशन लॅब’बरोबर उद्योजकतेचे धडे मिळण्यासाठी तज्ज्ञांच्या व्याख्यानांसाठी संस्थांनी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मूळ कल्पना आहे. मात्र, त्यासाठी सक्ती नाही.’’

पुणे - अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे मिळावे, त्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ‘इनोव्हेशन लॅब’ करण्याचे सूचित केले आहे. 

महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा असतात. विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्तस्वरूप येण्यासाठी सुविधा असावी म्हणून परिषदेने सुमारे देशातील प्रत्येक महाविद्यालय किंवा तंत्र शिक्षण संस्थांमध्ये नवसंशोधन परिषद स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिक्षण संस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत या उपक्रमात सहभागी व्हावे, अशी परिषदेच्या अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. 

मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे मुख्य नवसंशोधन अधिकारी डॉ. अभय जेरे म्हणाले, ‘‘शिक्षण संस्थांनी इनोव्हेशन कौन्सिल करावे, असे त्यांना सांगितले आहे. यातून नवसंशोधनाला प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे. केवळ ‘इन्क्‍युबेशन सेंटर’चा उपयोग काय? त्यासाठी लागणाऱ्या नव्या कल्पना कुठून येणार? नव्या कल्पना विद्यार्थ्यांमधून याव्यात, यावर आमचा भर राहणार आहे. देशात एक हजार संस्थांमध्ये हे कौन्सिल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.’’

‘‘शिक्षण संस्थांमध्ये नवसंशोधन, स्टार्टअप वा उद्योजकता विकास व्हावा, असे वाटत असेल, तर तिथे त्या प्रकारची संस्कृती जोपासली गेली पाहिजे.

नवसंशोधन परिषद किंवा कौन्सिलचा हेतू तोच आहे. एकदा पोषक वातावरण मिळाले, की त्यातून स्टार्टअप सुरू होण्यास आणि विद्यार्थी स्वयंरोजगाराकडे वळण्यास मदत होईल. हे स्वयंस्फूर्तीने व्हावे म्हणून कोणतीही सक्ती आम्ही 
केलेली नाही,’’ असे डॉ. जेरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Student Innovation Lab AICTE