अकरावी प्रवेशाबाबत अद्याप अनिश्चितता; विद्यार्थी-पालक चिंतेत

अकरावी प्रवेशाबाबत अद्याप अनिश्चितता; विद्यार्थी-पालक चिंतेत

पुणे -  पुणे, मुंबई, नागपुर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती येथे इयत्ता अकरावीला प्रवेश घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्या जवळपास पाच लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणी लागला आहे. सर्वोच्च न्यायालयालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आदेशाच्या अनुषंगानेही ही प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. मात्र तेरा-चौदा दिवस उलटले तरी अद्याप शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही पावले उचलली नसल्याने विद्यार्थी-पालकांची 'टेन्शन' वाढले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिली गुणवत्ता यादी जाहीर होऊन, त्यातील प्रवेशही निश्चित झाले आहेत. या प्रक्रियेतील दुसरी नियमित गुणवत्ता यादी १० सप्टेंबरला जाहीर होणार होती. त्याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना होती. दुसऱ्या यादीत आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळेल आणि आपल्याला तिथे प्रवेश घेता येईल, अशी विद्यार्थ्यांना आशा होती. मात्र दूसरी गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वीच ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा कधी सुरू होणार आणि महाविद्यालयातील प्रवेश निश्चित होऊन आपण कधी निरधास्त होऊ, अशी चिंता विद्यार्थी-पालकांना सतावत आहे. या प्रवेश प्रक्रियेबाबत विचारण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अकरावी प्रवेशाचा आढावा : 
शहर : नोंदणी झालेल्या अर्जाची संख्या : महाविद्यालयांची संख्या : प्रवेशासाठी जागा : प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : रिक्त जागा
मुंबई : २,७५,६०३ : ८४४ : ३,२०,८३० : ७८,६११ : २,४२,२१९
पुणे : १,००,३७२ : ३०४ : १,०७,०३० : ३०,५५६ : ७६,४७४
नागपुर : ४१,६०७ : २१६ : ५९,१७० : १५,९७२ : ४३,१९८
नाशिक : ३१,४६० : ६० : २५,२७० : ८,१८३ : १७,०८७
औरंगाबाद : २४,९८० : ११६ : ३१,४७० : ७,८८२ : २३,५८८
अमरावती : १४,९९० : ६३ : १५,३६० : ४,९२६ : १०,४३४

"इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२०-२१ अंतर्गत नियमित दूसरी प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी १० सप्टेंबरला जाहीर होणार होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षण संदर्भातील आदेशाच्या अनुषंगाने यापुढील इयत्ता अकरावी प्रवेशाची कार्यवाही पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील कार्यवाहीचे वेळापत्रक शासन आदेश आल्यानंतर जाहीर करण्यात येईल." असा संदेश गेल्या काही दिवसांपासून अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर दिसत आहे. 

"अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर ही प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचा केवळ संदेश दिला आहे. त्या व्यतिरिक्त अद्याप शिक्षण विभाग, राज्य सरकारने विद्यार्थी-पालकांना दिलासा देणारी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्याबाबत कोणीही बोलत नाही. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेबाबत आणखी किती दिवस अनिश्चितता राहणार, हा प्रश्न पडत आहे."
- अंकुश पवार, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com