छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

प्रफुल्ल भंडारी
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

दौंड तालुक्यातील काळेवाडी येथील भैरोबा वस्ती येथे राहणाऱ्या करिष्मा दत्तात्रेय चव्हाण (वय 16) या विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली.
 

दौंड (पुण) : दौंड तालुक्यातील काळेवाडी येथील भैरोबा वस्ती येथे राहणाऱ्या करिष्मा दत्तात्रेय चव्हाण (वय 16) या विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली.
दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार गोपाळ ओमासे यांनी या बाबत माहिती दिली. बुधवारी (ता. 7) राहत्या घरी करिष्मा हिने आत्महत्या केली. किरण अण्णा रणसिंग (वय 18, रा. हिंगणी बेर्डी, ता. दौंड) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

करिष्मा ही काळेवाडी येथील स्वर्गीय सुभाष कुल विद्यालयात शिक्षण घेत होती व विद्यालयाचा माजी विद्यार्थी किरण रणसिंग हा तिला विद्यालयात येऊन आणि रस्त्यात अडवून सतत त्रास देत होता. "आपण पळून जाऊ. तू नाही आली तर जीव देईन' अशी धमकी देत होता. करिष्मा हिच्या कुटुंबीयांनी या बाबत त्याला ताकीद दिली होती. तरी देखील त्याने सतत त्रास दिल्याने करिष्मा तणावात होती व तिने आत्महत्या केली, अशी फिर्याद तिची आई माला दत्तात्रेय चव्हाण यांनी दिली आहे. फिर्यादीनुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण रणसिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गुरुवारी (ता. 8) संशयित आरोपी किरण रणसिंग यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक हृषीकेश अधिकारी यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Suicide