पुण्यात हेल्मेटसक्तीसाठी विद्यार्थी लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

काही महाविद्यालयांनाच पत्र 
वाहतूक शाखेच्या काही विभागांनी शाळा-महाविद्यालयांना हेल्मेटसक्‍तीबाबत पत्र पाठविल्याचे काही महाविद्यालयांनी स्पष्ट केले. मात्र अजूनही अनेक महाविद्यालये याबाबत अनभिज्ञ आहेत. असे असतानाही कारवाई होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पुणे - कारवाई फक्त हेल्मेट न घालणाऱ्यांविरुद्ध नाही तर सर्वसमावेशक असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असताना, प्रत्यक्षात हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवरच पोलिसांकडून कारवाई होत असल्याची सद्यःस्थिती आहे. विशेषतः वाहतूक पोलिसांकडून शहरातील शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थीच लक्ष्य केले जात आहेत. या कारवाईने विद्यार्थी, शिक्षक व पालक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी हेल्मेटसक्तीचा आदेश दिल्यानंतर काही संघटनांनी त्यास विरोध दर्शविला. त्यानंतर ‘हेल्मेटसक्ती नव्हे, तर शिस्तीचा भाग आहे’ असे सांगत पोलिसांनी हेल्मेट कारवाई सुरू ठेवली. शासकीय कर्मचाऱ्यांनंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांना आपले लक्ष्य केले आहे. वाडिया महाविद्यालय, सेंट मीराज या शाळा-महाविद्यालयांसह काही शाळा महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोरच पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे वातावरण सुरू आहे. त्यातच वाहतूक पोलिसांचे पथक सकाळी १० ते दुपारी १२.३० पर्यंत शाळांबाहेर थांबून केवळ विद्यार्थ्यांनाच लक्ष्य करत आहेत. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीवरील विद्यार्थ्यांकडून  ५०० ते ७०० रुपये दंड आकारला  जात आहे. 

वाहतूक शाखेने आमच्या महाविद्यालयाला हेल्मेटबाबत कोणतीही नोटीस पाठविलेली नाही. तरीही चार दिवसांपासून कोरेगाव पार्क वाहतूक पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर कारवाई केली जात आहे. 
- प्रा. सुवर्णा पाठक-देवळाणकर, सेंट मीराज महाविद्यालय 

विद्यार्थ्यांमध्ये दोन महिन्यांपासून वाहतुकीच्या नियमांचे पालन, हेल्मेट, सीटबेल्टचा वापर याविषयी जनजागृती केली जात आहे. त्यानंतर सध्याची कारवाई सुरू केली असून ती फक्त हेल्मेट न घालणाऱ्यांसाठी नाही तर सर्वसमावेशक आहे. 
 तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.

काही महाविद्यालयांनाच पत्र 
वाहतूक शाखेच्या काही विभागांनी शाळा-महाविद्यालयांना हेल्मेटसक्‍तीबाबत पत्र पाठविल्याचे काही महाविद्यालयांनी स्पष्ट केले. मात्र अजूनही अनेक महाविद्यालये याबाबत अनभिज्ञ आहेत. असे असतानाही कारवाई होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Student targets for helmets in Pune