विद्यार्थ्यांच्या गणवेशाला विलंब लागणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पुणे - महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीच्या विषयाला अद्याप मंजुरी मिळू शकली नाही. यामुळे विद्यार्थ्यांना लवकर गणवेश मिळू शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

पुणे - महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीच्या विषयाला अद्याप मंजुरी मिळू शकली नाही. यामुळे विद्यार्थ्यांना लवकर गणवेश मिळू शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा विषय स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. या विषयावर अद्याप एकमत होत नाही. राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या विषयावर अनेक मते मांडली गेली. त्यानंतर प्रशासनाने डी. बी. टी. कार्डद्वारे गणवेश वाटप करण्याची भूमिका मांडली. त्यावरही एकमत झाले नाही. विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्याचा विचार पुन्हा केला जाऊ लागला. त्यामुळे स्थायी समितीच्या तीन बैठकांत हा विषय मार्गी लागू शकला नाही. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळातर्फे गणवेश पुरवठ्याचा प्रस्ताव महापालिकेकडे आला आहे.

या प्रस्तावावरही समितीत चर्चा झाली, परंतु या विषयावर पुढील बैठकीत निर्णय घेण्याचे ठरले. या प्रस्तावाला कॉंग्रेस पक्षाकडून उपसूचना देण्यात येणार असल्याचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सांगितले. मागील वर्षाप्रमाणे डी. बी. टी. पद्धतीनुसार गणवेश वाटप करावे, दुकानदारांचे नव्याने पॅनेल करावे, पुरवठादार दुकानदारांनी निष्कृष्ट दर्जाचे साहित्य, गणवेश दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे या उपसूचनेत नमूद केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ग्रंथालय स्थलांतरास मान्यता
विश्रामबागवाडा येथे असलेल्या शासकीय विभागीय ग्रंथालय शनिवार पेठेतील न. वि. गाडगीळ शाळेच्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. हे ग्रंथालय 1948 ते 1969 या कालावधीत महापालिकेकडून चालविले गेले. 1967 मध्ये महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम संमत करून त्यास शासकीय विभागीय ग्रंथालयाचा दर्जा आणि नाव दिले गेले. ग्रंथालयात 3 लाख 56 हजार 570 ग्रंथसंपदा आहे. सुमारे 12 हजार 658 इतके सभासद आहेत. विश्रामबागवाडा ही वास्तू ऐतिहासिक आणि जुनी झाल्याने ग्रंथालय गाडगीळ शाळेत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

इतर निर्णय
* वारजे पंपिंग स्टेशन व खडकवासला येथे "रॉ वॉटर पंपिंग' करण्यासाठी यंत्रणा बसविण्यासाठी सुमारे 96 लाख 90 हजार रुपयांच्या निविदेला मंजुरी
* महापालिकेच्या रुग्णालयात जमा होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुक्ता टिळक यांनी महापौर निधीतून 70 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. नायडू रुग्णालय आणि कमला नेहरू रुग्णालयासाठी ही मशिन खरेदी करण्याच्या निविदेस मंजुरी

Web Title: student uniform school municipal