मागण्यांसाठी विद्यार्थ्यांची विधान भवनावर धडक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती द्यावी, विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक सोई-सुविधा द्याव्यात, वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी, यांसारख्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने(अभाविप) सोमवारी विधान भवनावर "छात्रक्रांती मोर्चा' काढला.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती द्यावी, विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक सोई-सुविधा द्याव्यात, वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी, यांसारख्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने(अभाविप) सोमवारी विधान भवनावर "छात्रक्रांती मोर्चा' काढला.

मोर्चाला बारा वाजण्याच्या सुमारास शनिवारवाडा येथून प्रारंभ झाला. शहरातील विविध महाविद्यालयांमधील अडीच हजार विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते. दुपारी दीड वाजता मोर्चा विधान भवनावर पोचला. त्यानंतर "अभाविप'चे पुणे महानगर अध्यक्ष प्रा. प्रसाद कोरडे यांच्या नेतृत्वाखालील देवश्री खरे, प्रतीक दामा, आदिती कुलकर्णी, राघव पुराणिक, सागर काळे यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवेदन दिले.

प्रा. कोरडे म्हणाले, 'पुणे विद्यापीठांतर्गतच्या 300 महाविद्यालयात आमच्या विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये विविध प्रकारच्या समस्या पुढे आल्या आहेत. या प्रश्‍नांची तत्काळ सोडवणूक व्हावी, म्हणून हा मोर्चा काढण्यात आला. महाविद्यालयीन, शिष्यवृत्ती, नेट-सेट परीक्षा, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन शाखा, डीएड, बीएड, कृषी शिक्षण शाखेच्या असंख्य समस्या आहेत. ग्रंथालये, वसतिगृहे, स्वच्छतागृहांचा अभाव आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जात नाही. या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे.''

संघटनेच्या प्रतिनिधींनी मुठे यांच्यासमोर विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. मुठे यांनी निवेदन स्वीकारत या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोचविण्याचे आश्‍वासन दिले.

संघटनेच्या प्रमुख मागण्या
* महाविद्यालयात "यूजीसी'च्या नियमाप्रमाणे सुविधा असाव्यात
* मान्यताप्राप्त प्राध्यापकांची भरती करावी
* सर्व महाविद्यालयांचे "ऍकॅडमिक ऑडिट' करावे
* "ईबीसी' सवलतीची रक्कम वजा करून प्रवेश शुल्क घ्यावे
* सर्व शिष्यवृत्तींसाठी "एक खिडकी योजना' असावी
* सेट परीक्षा दोन वेळा घ्यावी
* केंद्रप्रमुख पदासाठीच्या भरतीसाठी डीएड व बीएड पात्र विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे
* कृषी विद्यापीठातील रिक्त पदांची त्वरित भरती करावी.

विधान भवन - विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सोमवारी काढलेल्या छात्रक्रांती मोर्चात सहभागी झालेले विद्यार्थी.

Web Title: students demand rally on vidhan bhavan