पुण्यात "नेट'च्या परीक्षेचा गोंधळ;विद्यार्थ्यांचे नुकसान

वृत्तसंस्था
रविवार, 22 जानेवारी 2017

या प्रकरणी केंद्रीय अनुदान आयोगानेही (युजीसी) हात झटकले. आयोगाचे दिल्लीतील सहसंचालक सुरिंदरसिंग यांनी यासंदर्भात सीबीएसईशीच  बोला, असा सल्ला दिला

पुणे - राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (नेट) बसणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आज (रविवार) परीक्षा केंद्राचे क्रमांक आणि पत्ता यात गोंधळ उउडाल्याने परीक्षेस मुकावे लागले.

शहरामधील लुल्लानगर, रेसकोर्स, दिघी, विश्रांतवाडी, नऱ्हे अशा विविध ठिकाणी असलेल्या केंद्रांवर नेटची परीक्षा घेण्यात आली. आज सकाळी साडे नऊ वाजल्यापासून ही परीक्षा सुरु होणार होती. मात्र हॉल तिकीटवर चुकीचा पत्ता दिल्यामुळे काही मुले वेळेवर परीक्षेस पोहोचू शकली नाहीत. हॉल तिकिटावर पत्ता एका ठिकाणचा आणि प्रत्यक्षात क्रमांक दुसरीकडचा, अशी परिस्थिती उद्‌भविल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या या परीक्षेसाठी विद्यार्थी सकाळी सहा वाजल्यापासून फिरत आहेत. मात्र यानंतरही लुल्लानगर येथे किमान 50 जण "सीबीएसई'च्या चुकीमुळे परीक्षेपासून वंचित राहिले. या विदद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर पत्ता लुल्लानगरचा आणि केंद्राचा क्रमांक चुकीचा आल्याने अडचण निर्माण झाली. लुल्लानगर येथे गोंधळ झाल्याने केंद्रीय विद्यालयाच्या लोकांनी पोलिस बोलावले. मात्र या गोंधळावर त्वरित मार्ग न निघाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.

कुलदीप देशमुख हा नेटला बसणारा विद्यार्थी आधी लुल्लानगरला गेला. तेथून त्याला रेसकोर्सला पाठविण्यात आले. यानंतर दिघी व त्यानंतर तो विश्रांतवाडीला गेला. अखेर त्याचे केंद्र नऱ्ह्यामधील सिंहगड महाविद्यालयात सापडले. मात्र तेथे तो पोहोचेपर्यंत पहिला पेपरची वेळ संपली होती.

याशिवाय, ट्रॅफिक किंवा इतर कारणांमुळे काही विद्यार्थी फक्त 1-2 मिनटे परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचल्यामुळे त्यांना परिक्षेस बसू दिले गेले नाही. या विद्यार्थ्यांशी कोणतीही चर्चा करण्यासही नकार देण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये पुण्यासहित आणि बाहेरील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश होता. या परीक्षेसाठी जळगावहून आलेल्या अपंग विद्यार्थ्यासही परीक्षेस मुकावे लागले.

या प्रकरणी केंद्रीय अनुदान आयोगानेही (युजीसी) हात झटकले. आयोगाचे दिल्लीतील सहसंचालक सुरिंदरसिंग यांनी यासंदर्भात सीबीएसईशी बोला, असा सल्ला दिला. मात्र सीबीएसईच्या माणसांशी तुम्ही का बोलत नाही, असे विचारणा करताच ती आमची जबाबदारी नाही, असे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी नुकसान सोसावे लागलेल्या मोरे नावाच्या एका विद्यार्थिनीसह तीन जणांच्या हॉल तिकीटवर पाषाणच्या शाळेचा पत्ता होता. पण त्या शाळेत गेल्यावर भूकुममधील एका शाळेत परीक्षा असल्याचे सांगण्यात आले. ही शाळा एका डोंगरावर होती. "हॉल तिकीटवरील पत्त्यानुसार ते पाषाण शाळेत एक तास आधी पोहोचले होते. परंतु तेथून भुकुमच्या शाळेत पोचेपर्यंत 9.25 झाले. मात्र प्रवेशद्वारापर्यंत पोहोचेपर्यंत 5 मिनिटे उशीर झाला, आणि परीक्षेस मुकले,' अशी भावना तिने व्यक्त केली.

Web Title: Students missed NET exam due to ill planning