कोवळ्या वयातच अभ्यासाचे जड झाले ओझे...

मीनाक्षी गुरव 
मंगळवार, 3 जुलै 2018

पुणे - वयाची दोन वर्षेही न उलटलेल्या कोवळ्या बोटांमध्ये पेन्सिल देऊन मुलाचा शैक्षणिक पाया पक्का करण्याचा विचार तुम्ही करत असाल, तर क्षणभर थांबा. कारण, यातून पाया निश्‍चित पक्का होणार नाही, तर भविष्यात त्याची शैक्षणिक आणि सर्वांगीण प्रगती धोक्‍यात येऊ शकते.

पुणे - वयाची दोन वर्षेही न उलटलेल्या कोवळ्या बोटांमध्ये पेन्सिल देऊन मुलाचा शैक्षणिक पाया पक्का करण्याचा विचार तुम्ही करत असाल, तर क्षणभर थांबा. कारण, यातून पाया निश्‍चित पक्का होणार नाही, तर भविष्यात त्याची शैक्षणिक आणि सर्वांगीण प्रगती धोक्‍यात येऊ शकते.

मुलांचे अभ्यासाचे नेमके वय, कोणत्या वयात काय आणि कसे शिकावे याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक व पालक अनभिज्ञ असल्याचे समोर येत आहे. द अर्ली चाइल्डहूड असोसिएशन या संस्थेने पोतदार इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सहकार्याने ‘बालवाडीतील मुलांच्या डोक्‍यावरील अभ्यासाचा ताण’ विषयावर केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली. शिक्षणविषयक धोरणांबाबत २१ टक्के शाळाप्रमुख आणि दोन टक्के पालकांना माहिती असल्याचे दिसून आले.

नॅशनल अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन (ईसीसीई) अभ्यासक्रमानुसार 
 दोन ते तीन वर्षे : खेळाशी निगडित उपक्रम
 तीन ते चार वर्षे : मुलांचा पाया भक्कम करणारे, सर्वांगीण विकासास मदत करणारे उपक्रम. शारीरिक आणि मानसिक विकासावर भर. मुलांची बोटे नाजूक असल्याने छोट्या-छोट्या खेळण्यांद्वारे त्यांची पकड मजबूत बनविणारे उपक्रम.
 चार ते पाच वर्षे : ‘शिकायचे कसे’, यासाठी मदत करणाऱ्या उपक्रमास सुरवात 

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा म्हणतात...
 मेंदूचा विकास होत असताना, मुलांवर अभ्यासाचा दबाव टाकू नये 
 स्पर्धात्मक युगात गुणांद्वारे मूल्यांकन केल्याने मुलांच्या मनावरील ताण वाढतोय 
 नकारात्मक भावना निर्माण होण्याची भीती 
 रोबोटिक पद्धतीने मुलांना प्रशिक्षित करणे अयोग्य 

असे झाले सर्वेक्षण :
 राज्यातील ७५० (पुण्यातील ३२०) शाळांचा समावेश
 दीड हजार पालकांशी संवाद
 विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार शिक्षण पद्धतीबाबत शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांना प्रश्‍न विचारण्यात आले.

स्पर्धात्मक युगात प्रत्यक्षात पालकही मुलांकडून अधिक अपेक्षा ठेवत असून, त्याप्रमाणे शाळांवर दबाव टाकला जात असल्याचे दिसत आहे. 
- डॉ. स्वाती वत्स, अध्यक्षा, द अर्ली चाइल्डहूड असोसिएशन 

Web Title: Study the heavy burden of a tender age