गाडीखेल, सावळ व उंडवडी ग्रामस्थांनी अभ्यास दौऱ्यातून जाणून घेतला गावविकासाचा मार्ग

संतोष आटोळे 
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पियोजीयो व्हेईकल्स कंपनीच्या वतीने उंडवडी क. प.,गाडीखेल, सावळ हे गाव दत्तक घेण्यात आले आहे. या माध्यमातून गावामध्ये विविध विकासकामे, तसेच सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते.

शिर्सुफळ - बारामती तालुक्यातील गाडीखेल, उंडवडी क. प. व सावळ येथील 70 ग्रामस्थांची पियाजीयो व्हेईकल्स प्रा. लि. बारामती यांच्या सामाजिक बांधिलकी निधीतून संजीवनी सक्षमीकरण आणि विकास संस्था औरंगाबाद यांच्या माध्यमातून राज्यातील आदर्श ग्राम राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, दरेवाडी येथे अभ्यास सहल आयोजित केली होती. याद्वारे ग्रामस्थांनी संबधित गावच्या विकासाचे गमक जाणून घेत तशाच पद्धतीने वाटचाल करण्याचा निर्धार केला. 

पियोजीयो व्हेईकल्स कंपनीच्या वतीने उंडवडी क. प.,गाडीखेल, सावळ हे गाव दत्तक घेण्यात आले आहे. या माध्यमातून गावामध्ये विविध विकासकामे, तसेच सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. यामध्ये प्रथम आदर्श ग्राम राळेगणसिद्धी येथे भेट देण्यात आली. त्या गावामध्ये समाजसेवक अण्णा हजारे यांच्या माध्यमातून उभा राहिलेल्या विकासाच्या मॉडेलची माहिती जाणून घेतली. त्यानंतर आदर्शग्राम हिवरे बाजार या गावाला भेट दिली. येथे महाराष्ट्र राज्य आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष, पोपटराव पवार यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. येथे पाणलोट विकास अंतर्गत केलेल्या कामांची पाहणी केली. पाण्याचे नियोजन कसे करावे, पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत कामे कशी करावीत, याबाबत माहिती घेण्यात आली. त्यानंतर फादर हार्मन बाखर यांनी उभ्या केलेल्या प्रशिक्षण केंद्राला व दरेवाडी गावात भेट दिली. येथे डोंगराळ भागात अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केलेली आहे. पाणलोटक्षेत्र विकास अंतर्गत चांगली प्रकारे कामे झालेली आहेत.

या अभ्यास सहली दरम्यान ग्रामस्थानी मोठ्या उत्सुकतेने सर्व गावातील माहिती व विकासकामे जाणून घेतली व तशीच कामे आपल्याकडे राबविण्याचा निर्धार केला. यामध्ये पियाजीयो कंपनीचे व्यवस्थापक योगेश कापसे, संजीवनी संस्थेचे  व्यवस्थापक हरिभाऊ नांगरे, प्रकल्प समन्वयक आप्पासाहेब बोडखे, ग्रामपंचायत उंडवडी क. प. चे सरपंच विशाल कोकरे, गाडीखेल ग्रामपंचायत चे सरपंच बाळासाहेब आटोळे, सावळ ग्रामपंचायत चे सरपंच राजेंद्र आटोळे व इतर ग्रामस्थ सहभागी होते.
 

Web Title: Study tour of gadikhel saval and undavadi villagers