औदार्याची खाण; वाढे पीएमपीचा मान

औदार्याची खाण; वाढे पीएमपीचा मान

चिंगे, पुण्यातील ही वास्तुकला पाहून आश्‍चर्याने असं तोंडात काय बोट घालतेस? असं आगळं- वेगळं घर जगाच्या पाठीवर तू कोठेही पाहिले नसशील म्हणून तुला धक्का बसला ना ! पुण्यातील वास्तुकलेचा तुला अभिमान तर वाटायला लागला नाही ना? अगं नीट पहा. ते काही घर नाही. तो पीएमपीचा बसथांबाच आहे. पण सध्या तिथे एक कुटुंब राहत आहे. पुण्यात अनेक ठिकाणी तुला हे दृश्‍य दिसेल. 

आपल्या देशात रस्त्यावर, पदपथावर अगदी स्मशानभूमीतही अनेकांनी अतिक्रमण करून, घरे बांधली असतील. पण फक्त पुण्यातच पीएमपीच्या बसथांब्याचे घरात रूंपातर केले जाते. बरं हे काय फक्त दोन- चार महिनेच नसते बरं का? काहीजण तर वर्षानुवर्षे या घरात राहत असल्याचे उघड झाले आहे. काहींनी तर हुंडा म्हणून अशी घरे आपल्या जावयांना दिल्याची चर्चा आहे. महापालिका व पीएमपी प्रशासन हे फार उदार अंतः करणाचे आहेत, याची तुला कल्पना असेलच. ते कधीही या मंडळींना बेघर करणार नाहीत. उलट वीज व पाणीपुरवठा व्यवस्थित होतो ना? याचीच चौकशी ते माणुसकीच्या नात्याने करतील. जगात माणुसकीच हरवली आहे, अशी ओरड नेहमी होते. मात्र, पीएमपी प्रशासन याला अपवाद आहे. या खात्याकडे गरीबांविषयी कनवाळा, आत्मीयता व प्रेम ओतप्रोत भरले आहे. ‘पाच रुपयांत प्रवास’ अशा योजना गरिबांसाठी ते राबवतात. मात्र, गरीब माणसे पीएमपीतून कमी खर्चात प्रवास करतील पण त्यांनी राहावयाचे कोठे, असा प्रश्‍न प्रशासनाला पडला असावा. मग त्यातूनच कोणी बसथांब्याचे घरात रूंपातर केले तर त्याच्यावर कारवाई करीत नसल्याची चर्चा आहे. 

पीएमपीने काही ठिकाणी ‘दिवसा बसथांबा, रात्री निवासव्यवस्था’ अशीही योजना राबवायला हवी. अनेकदा बस वेळेवर येत नाही. त्यावेळी प्रवाशी वाट पाहून थकून जातात, त्यांच्या निवासाची व्यवस्था करता येईल  

चिंगे, अगं थांब ! समोर दिसतोय तो पार्किंग एरिया नाही बरं का? अगं तोही पीएमपीचा थांबाच आहे. पीएमपीची फक्त गरिबांवर कृपादृष्टी आहे, असा आरोप होऊ नये म्हणून ते मध्यमवर्गीयांसाठीही काही योजना राबवतात. एकवेळ सर्व पुणेकरांनी प्रेमाने हेल्मेट घातल्याचे दृश्‍य तुला दिसेल पण पुण्यात पार्किंगला जागा मिळाली आहे, हे बाब एकदम अवघड आहे. नेमकी हीच अडचण ओळखून पीएमपीने त्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. पुण्यातील अनेक बसथांब्यासमोर दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग तुला दिसेल, त्यामागे हेच कारण आहे. 

चिंगे, समोरची माणसे जोरात का पळत आहे, असा तुला प्रश्‍न पडलाय ना? अगं ते पीएमपीचे प्रवासी आहेत. थांब्याजवळ बस कधीच थांबत नसल्याने त्यांना असे रोज पळावेच लागते. हल्ली पुणेकर व्यायाम विसरले आहेत. त्यांना पळण्याचा व्यायाम घडावा, यासाठीच बस थांब्यापासून लांब उभी केली जाते, कळलं का? बसमध्ये शिरल्यावर कंडक्‍टरकडून प्रवाशांचा सुट्या पैशांवरून वा इतर कारणांवरून सतत अपमान केला जातो, यामागे प्रवाशांचा संयम हा गुण वाढावा, हाच हेतू पीएमपीचा असतो. 

चिंगे, पीएमपीकडून सतत गरीब व सर्वसामान्य माणसांचाच विचार केला जातो, हे तुला आता समजले असेल. त्यामुळे बसथांब्यावर बसायला जागा नाही, उन्हात ताटकळत उभे राहावे लागले, बस उशिरा आली, बसमध्ये बसायला जागा नाही वा कंडक्‍टरकाकांकडून अपमान सहन करावा लागला, या गोष्टींचा तू राग मानत जाऊ नकोस. ही मंडळी आपल्यासाठी एवढं काही करत असताना, तूही काही त्याग करायला शिकले पाहिजेस. कळलं ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com