अस्सं सासर सुरेख बाबा!

अस्सं सासर सुरेख बाबा!

‘आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर बायकोच्या मर्जीप्रमाणे वागा व सासरकडील माणसांना मान द्या’, या वाक्‍यावर आमचा पहिल्यापासून भरवसा आहे. म्हणूनच बायकोने तिच्या दूरच्या बहिणीला उद्या भेटायला जायचे आहे, असे फर्मान काढल्यावर आम्ही मुकाट्याने मान डोलावली. ‘अगं नीट पत्ता घे. नंतर ताप नको.’ आम्ही फक्त एवढंच म्हणालो. त्यावर कर्वे पुतळ्याजवळून उजवीकडे वळल्यावर कोडीतकर कोठे राहतात, एवढं शेंबड्या पोराला विचारलं तरी ते घरी आणून सोडेल. इतकं प्रसिद्ध आहे माझ्या बहिणीचं सासर. नाहीतर तुम्ही! गल्लीवरचं कुत्रंदेखील तुम्हाला ओळखत नाही. काय बाई! माझ्या मेलीचं नशीबच फुटकं. मला काय एक एक स्थळ येत होती. एक तर राजघराण्यातलं आलं होतं; पण मी बाई मुलखाची मूर्ख. मागचा-पुढचा कसलाही विचार न करता तुम्हाला होकार कळवला. भोगतेय त्याची फळं.’ 

आमच्या लग्नाला आता वीस वर्षे झालीत. पण तिच्या सर्व मावस, चुलत आणि सख्ख्या बहिणींच्या सासरचा विषय निघाला की या विषयावरून तिला भरून आलंच म्हणून समजा. अशा वेळी आम्ही कानात कापसाचे बोळे घालतो व तिने विचारलेच तर अत्तराचे आहेत, असे सांगतो.

बायकोच्या आदेशानुसार, आज सकाळी लवकरच आम्ही तिच्या बहिणीकडे नेहाकडे निघालो. तिला सरप्राइज द्यायचं म्हणून फोनही केला नाही. माझ्या दुर्दैवाने गाडी फक्त एकदा रस्त्यात बंद पडली. ‘अगं बाई. बंद पडली का गाडी. पण असला खटारा ठेवलाय कशाला? नेहाच्या दारात गाडी बंद पडली तर माझ्या इज्जतीचा फालुदा होईल, त्याचं काय? मला मेलीला चांगली स्थळं येत होती. एकाकडं तर चांगल्या पाच-सहा गाड्या होत्या. पण मीच या खटारा गाडीच्या मालकाला....’ एवढं म्हणेपर्यंत गाडी सुरू झाली. त्यामुळं पुढचं काही ऐकू आलं नाही. आम्ही थेट गाडी कर्वे पुतळ्याजवळ आणली व इकडे-तिकडे शोधू लागलो. बायकोने काय शोधताय, असे विचारल्यावर आम्ही ‘शेंबडं पोर शोधतोय’ एवढं उत्तर दिलं. त्यावर तिने मोठे डोळे केले. आम्ही रस्त्यावरील प्रत्येकाला कोडीतकर कोठे राहतात? असा प्रश्‍न विचारला. पण प्रत्येकाने आम्हाला वेड्यात काढलं. पूर्ण पत्ता सांगा, असा डोसच काहींनी दिला. ‘कर्वे पुतळ्याजवळ सृजन गार्डन सोसायटी.’ बायकोने आणखी माहिती पुरवली. ‘अहो, ती सोसायटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आहे.’ ‘असेल....असेल....’ असं तिनं म्हटलं. त्यानंतर कोथरूडमधील सगळ्या पुतळ्यांचा परिसर पालथा घातला. थोड्या वेळाने आम्हाला असं वाटू लागलं की पत्ता शोधता शोधता आम्ही धारातीर्थी पडलोय व त्यानिमित्त आमचाच पुतळा एके ठिकाणी उभारलाय. शेवटी एकदाचा नेहाचा पत्ता सापडला. घरी गेलो तर नेहा ऑफिसमध्ये असल्याचे कळले व तिच्या सासूबाई एकट्याच घरी होत्या. बायकोने ओळख सांगताच त्यांनी चेहऱ्यावर आनंद दाखवला. फ्रेश होऊन येते, असे सांगून बायको बाथरूममध्ये पळाली. आम्ही मात्र घामाघूम झाल्याने सोफ्यावर टेकलो. आमची ड्रायव्हरसारखी टोपी व गबाळा वेष पाहून नेहाच्या सासूला आम्ही ड्रायव्हरच आहोत, असे वाटले. ‘अहो, काय सांगायचं, तुझ्या बाईसाहेब दिसायला किती सुंदर आणि हुशार आहेत. तिला स्थळंही मोठमोठी येत होती. एक तर चक्क राजघराण्यातलं आलं होतं; पण काय तिचं नशीबच फुटकं. नवरा मिळालाय अगदीच वेडाबिद्रा, नेभळट आणि मुलखाचा आळशी. नेहा नेहमी सांगते त्याच्याविषयी. पण म्हणतात ना. पदरी पडलं अन्‌ पवित्र झालं...’ म्हातारी बरंच काही सांगत होती आणि आम्ही कानात कापसाचे बोळे घालून बसलो होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com