काकडे-देशमुख विवाह सोहळा खर्चाच्या आकड्यामुळे चर्चेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

पुण्यातील बालेवाडी-म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रिडा संकुलात आज दुपारी हा विवाह झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, अमृता फडणवीस यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते.

पुणे - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन आणि भाजपचे खासदार संजय काकडे यांची कन्या कोमल यांचा विवाह आज पुण्यात मोठ्या थाटामाटात झाला. मात्र लग्नातील भपकेबाजपणा आणि त्यासाठी झालेला मोठा खर्च यामुळे या सोहळ्यावर सोशल मिडियातून टीका होत आहे. या टिकेनंतर काकडे व देशमुख परिवाराने दुष्काळग्रस्त मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी एक कोटी रूपयांची देणगी दिल्याचे जाहीर केले आहे. 

दोन्ही नेते सत्ताधारी भाजपचे असल्याने या विवाह सोहळ्यातील खर्चावर टीका होत आहे. मराठवाड्यातील मुलींच्या पित्याकडे हुंडा देण्यासाठी पैसा नाही म्हणून त्या आत्महत्या करत असताना या नेत्यांनी संवेदनशीलता दाखवत लग्नातील खर्चाला आवर घालायला हवा होता, अशी प्रतिक्रिया सोशल मिडियात उमटत आहे. 

पुण्यातील बालेवाडी-म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रिडा संकुलात आज दुपारी हा विवाह झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, अमृता फडणवीस यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते. सायंकाळी साडे सात वाजता स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. महागडी लग्नपत्रिका दोन्ही बाजूंनी निमंत्रितांना देण्यात आली. या सोहळ्यासाठी राजवाड्याची प्रतिकृती असलेला भव्य सेट व्यासपीठावर उभारण्यात आला आहे. लग्न सोहळा निमंत्रित व्यक्तींसाठी होता. मात्र स्वागत समांरभाचे भव्य-दिव्य नियोजन करण्यात आले आहे.

सुमारे वीस हजार लोक भोजनासाठी उपस्थित राहतील, हे लक्षात घेऊन तयारी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात व्हीआयपी उपस्थित राहणार असल्याने त्यांच्यासाठी वेगळी सोय करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आमदारपुत्राच्या खर्चिक विवाह सोहळ्यावरून टीका झाली होती. या आधी राष्ट्रवादीचे तत्कालीन मंत्री भास्कर जाधव यांच्या घरातील विवाह सोहळा खर्चावरून गाजला होता. 

Web Title: Subhash Deshmukhs son and mp Sanjay Kakade daughters marriage at Pune