कर्तृत्वाची यशोगाथा : गौरव देविदास अत्तरदे 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

बालपण- कौटुंबिक परिस्थिती 
गौरव अत्तरदे यांचा जन्म जळगाव येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील शेतकरी कुटुंबातील; परंतु नोकरीनिमित्त महात्मा फुले कृषी महाविद्यालयात प्राध्यापक होते. घरी आई गृहिणी व मोठी बहीण असा परिवार होता. वडिलांच्या नोकरीनिमित्त कोल्हापूर, धुळे, जळगाव अशा फिरस्तीमुळे अनेक शहरांमध्ये वास्तव्य झाले.

बालपण- कौटुंबिक परिस्थिती 
गौरव अत्तरदे यांचा जन्म जळगाव येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील शेतकरी कुटुंबातील; परंतु नोकरीनिमित्त महात्मा फुले कृषी महाविद्यालयात प्राध्यापक होते. घरी आई गृहिणी व मोठी बहीण असा परिवार होता. वडिलांच्या नोकरीनिमित्त कोल्हापूर, धुळे, जळगाव अशा फिरस्तीमुळे अनेक शहरांमध्ये वास्तव्य झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शालेय - महाविद्यालयीन शिक्षण -
गौरव यांचे पहिली ते दहावीचे शिक्षण न्यू सिटी हायस्कूल, धुळे येथे मराठी माध्यमात व अकरावी व बारावीचे शिक्षण एम.जे. कॉलेज जळगाव येथे झाले. वडील प्राध्यापक असल्याने शिस्तीचे जणू घरातूनच त्यांना बाळकडू होते आणि याच शिस्तीमुळे गौरव हे लहानपणापासूनच शालेय अभ्यासक्रम, वक्तृत्त्व स्पर्धा, क्रीडा, हस्ताक्षर या सर्वात अव्वल क्रमांकावर नैपुण्य मिळवायचे आणि याच दरम्यान त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, वीर सावरकर तसेच जेआरडी टाटा यांच्या थोर कर्तृत्त्वाचा ठसा उमटला. आपल्या उद्योगविश्वातही गौरव ‘जेआरडी टाटा’ यांनाच आपले आयडॉल मानतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढे बारावीनंतर गौरव अभियांत्रिकी प्रवेशानिमित्त १९९९ मध्ये पुण्यात आले; परंतु पहिले वर्ष मुलांच्या प्रचंड रॅगिंगमुळे प्रचंड भीतीतच गेले. यानंतर मात्र गौरव जिद्दीने आणि धडाडीने अभियांत्रिकीसह इतर अवांतर कौशल्य विकसनासह पुण्यनगरीत स्थिरस्थावर झाले.

उद्योग -
व्यवसायामागची पार्श्वभूमी, कसा व्यवसाय निवडला, कोणाकडून सहकार्य मिळाले : खरंतर अभियांत्रिकी शिक्षणात गौरव यांचे कधी मनच लागले नाही. तिसऱ्या वर्षाला असतानाच त्यांनी धनकवडी येथील गुडलक ऑटो केअरचे मालक धनंजय काबरा यांच्यासोबत भारती ट्रॅव्हल्सची स्थापना केली आणि अवघ्या वर्षातच त्यांनी प्राज इंडस्ट्रीज, पॅक इंडिया लिमिटेड अशा वेंडर्सकरिता तेव्हा सेवा पुरवत मोठ्या दिमाखात व्यवसायात वाढ केली. यावेळी मनुष्यबळाची कमतरता असताना त्यांनी प्रसंगी ड्रायव्हर म्हणूनही मुंबईला एअरपोर्टला संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोडवून त्यांचेकडून १०० रुपयांची टीपही घेतली; पण यातूनच गौरव यांना वेळेचे महत्त्व, शब्दाची किंमत आणि माणसं जपण्याची महती याचे यथार्थ अनुभव आले.

Image may contain: 1 person, sky, cloud, plant, tree and outdoor

यानंतर पुढे पुणे विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवी घेतल्यानंतर श्री. गौरव यांनी आपले अमेरिकास्थित मेहुणे श्री. नितीन कोलते यांच्याकरिता स्थावर मालमत्ता शोधातून, जमीन खरेदी- विक्री व मिळकत व्यवस्थापनातील उणिवा व त्यातून भविष्यातील संधी जाणून जमीन खरेदी- विक्रीच्या व्यवसायाकडे आपला मोर्चा वळविला व त्यानुसार गौरव यांनी वाकड, हिंजवडी येथे जमीन खरेदी विक्रीसह लायसनिंग सर्व्हिसेस सेवा पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला; परंतु यात त्यांना आपल्या पहिल्याच व्यवहारात सुमारे सोळा लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. पण यातूनही त्यांनी धीर न सोडता अतिशय धाडसाने सर्व समस्यांचे निराकरण करून संबंधित जमीन चेन्नई येथील कंपनीस यशस्वीरीत्या हस्तांतरण करून सुमारे ८० लाखांचा भरघोस नफा कमवला आणि यापुढे त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. यानंतर गौरव यांनी वाकड, हिंजवडी येथे अनेक आयटी कंपनीज तसेच हॉस्पिटॅलिटी कंपन्यांकरिता लायसन्स इनसर्व्हिसेस सेवा उपलब्ध करून भांडवलनिर्मिती केली व यातूनच त्यांनी डिसेंबर २००९ मध्ये जीआरडी इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला उद्योगात स्वतःला पूर्ण झोकून देऊन प्रसंगी तलाठी ऑफिस येथे रांगेत उभे राहून, सातबारा उतारे असो वा स्वतः मोजणी अधिकाऱ्यांसोबत जागेची मोजणी इत्यादी कामे स्वतः शिकून कंपनीच्या या कामात सिंहाचा वाटा उचलला. या सर्व कामात त्यांना महसूल अधिकारी श्री. ज्ञानेश्वर कारकर यांचे यथोचित मार्गदर्शन मिळाले.

काय काय ठळक कामे केली -
हे करत असताना सुरवातीला बांधकामाचा अनुभव म्हणून गौरव यांनी स्वतः बांधकाम कंत्राटं घेत आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटल, चेन्नई येथील हॉटेल क्वालिटी इन सब्री व इतर निवासी इमारती अशा अनेक भव्य वास्तूंची बांधकामेदेखील पूर्ण केली. पुढे याच कंपनीअंतर्गत त्यांनी बाणेर, बालेवाडी व वाकड येथे स्वतः जमीन विकसित करून निवासी प्रकल्प साकारले.

प्रकल्पांची बांधणी करताना गौरव यांनी उत्कृष्ट प्लॅनिंग व सर्वोत्तम व्हिजनसह ग्राहकाभिमुख सुविधा यावर पूर्ण भर दिला. यात त्यांना श्री. मधुकर खांदवे, मीरा दुबे यांसारखे जागामालक असो वा डॉ. मनीष कुलकर्णी, श्री. दिलीप चौधरी यांसारखे गुंतवणूकदार असो अशांची बहुमोल साथ लाभली. याशिवाय कंपनीतील इतर सर्व सहकारी, तसेच कंपनीकरिता कायम सल्ला देणारे वकील, आर्किटेक्ट्स, सीए व इतर सर्व कन्सल्टंट्सना गौरव आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय देतात.

यानंतर २०१७ मध्ये श्री. गौरव यांनी नोटाबंदीच्या खडतर काळातही रेसोनार हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेसची स्थापना करून आज ते बाणेर, बालेवाडी येथे ५८ रूम्स असलेली सर्व्हिस अपार्टमेंट मोठ्या दिमाखात चालवत आहेत. 

यानंतर २०१९ मध्ये गौरव यांनी आपले घनिष्ठ मित्र श्री. मंजुनाथ कुलकर्णी यांच्या साथीने रस्ते व इतर शासकीय इन्फ्रा प्रोजेक्टच्या बांधणीकरिता प्रगत भारत इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली व त्याअंतर्गत यांची एमआयडीसी औरंगाबाद व एनएचए अंतर्गत रस्तेबांधणी प्रकल्पांची कामे जोमात सुरू आहेत. खरंतर मोठी शासकीय कंत्राटं व तत्सम कामांच्या कंपनीच्या स्थापनेकरिता प्रोत्साहन व सर्व प्रकारची तांत्रिक मदत याचे संपूर्ण श्रेय गौरव, रुद्रणी इन्फ्रास्ट्रक्चरचे सुविख्यात श्री. विवेक देशपांडे यांना देतात.

यासोबत यांनी प्रगत भारत इपोंक्सि सोल्युशन्स या कंपनीची स्थापना करून पहिल्या सहा महिन्यांतच मुंबई व सातारा येथे प्रकल्पांचे अनावरण केले. 
मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात नेहमी नोकरीस प्राधान्य असतानाही उद्योग सुरू करता आला याचे संपूर्ण श्रेय गौरव आपले आई-वडील व पत्नी सौ. रचना अत्तरदे यांना देतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग काढण्यास आयुष्यात अध्यात्मिक पाठबळाची गरज असते. श्री. गौरव यांना असे अमूल्य अध्यात्मिक पाठबळ परमपूज्य दिघे मावशी व श्री. विजय पटवर्धन यांच्याकडून वेळोवेळी लाभले.

आगामी योजना -
येणाऱ्या काळात गौरव हे बाणेर, बालेवाडी, खराडी येथे व्यापारी संकुलांची उभारणी करीत आहेत. आजच्या इंटरनेट युगात रिअल इस्टेट कॉमर्स तसेच सप्लाय चेन मॅनेजमेंटचे उज्ज्वल भवितव्य समोर ठेवून त्यांनी लॉजिस्टिक्समध्ये देखील पदार्पण करण्याचे ठरविले आहे. यात त्यांना अतिशय जवळचे मित्र व सनदी अधिकारी श्री. भारत नवले यांचे मोलाचे मार्गदर्शन होत आहे.

याच्यासोबत भावी काळात महाराष्ट्रातील व इतर सर्व शहरांतून पुण्यात स्थलांतरित होणाऱ्या गरजू पोलीस अधिकारी व शिक्षक अशा समाजाचे रक्षण व जडणघडण करणाऱ्यांकरिता तसेच वृद्धांकरिता, केवळ विकलांग लोकांकरिता व निराधार महिलांकरिता सर्व सुविधांसह ना नफा ना तोटा या धर्तीवर पुणे व इतर परिसरात निवासी प्रकल्प उभारणीकरिता विशेष प्राधान्य देणार आहेत.

या सर्वातच एकंदरीत बांधकाम उद्योगात पारदर्शकता व गुणवत्ता निर्माण होऊन बांधकाम क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळण्यासाठी गौरव प्रयत्नशील राहणार आहे व याचप्रमाणे पुणे परिसरातील सर्व व जमीनमालकांना सर्रास जमिनी विक्री न करता आपल्या भावी पिढ्यांकरिता जमिनीचे उत्तम नियोजन, विकसन करून सर्वांगीण विकास कसा करावा याकरिता नॉलेज सेंटर उभारण्याचा गौरव यांचा मानस आहे. आजच्या काळात युवकांना बांधकाम व्यवसाय व त्या संबंधित निगडीत कुठलेही व्यवसाय सुरू करण्यास मार्गदर्शन व माहिती उपलब्ध करून देण्याकरता गौरव हे नेहमी तत्पर असतात.

बांधकाम व्यवसाय सुरू करण्याकरिता मोठ्या भांडवलाची आवश्यकता असा जनमानस आहे; परंतु सातत्य, चिकाटी व उत्कृष्ट नियोजन यातून अतिशय कमी भांडवलातूनदेखील बांधकाम व्यवसाय भरभराटीस येऊ शकतो असा गौरव यांचा विश्वास आहे, ते स्वतः याचे उत्तम उदाहरण आहेत.

युवा पिढीला काय संदेश द्याल -
'When you work, work as if everything depends on you. When you pray, pray as if everything depends on God!” – JRD Tata 
या उक्तीप्रमाणे तरुणांनी आयुष्यात कायम मोठी स्वप्न बघावी, ही मोठी स्वप्ने साकारताना सचोटीने, उत्कृष्ट उद्देशाने व विश्वासाहर्ता आणि पारदर्शकतेने ध्येयपूर्तीकडे मजल दरमजल करत आयुष्यात यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करावीत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Story Gaurav Devidas Attarde