#mynewspapervendor पेपर विक्रेता ते सनदी अधिकारी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

विक्रेत्यासोबत सेल्फी 
वर्षानुवर्षे आपल्या घरी वृत्तपत्र पोचवणाऱ्या विक्रेत्यासोबत घ्या एक सेल्फी आणि सलाम करा थंडी, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता कार्यरत राहणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना. हा सेल्फी #mynewspapervendor या हॅशटॅगसह पाठवा 99224 19150 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर किंवा wededitor@esakal.com या ई-मेलवर. या सेल्फीला ई-सकाळवर प्रसिद्धी दिली जाईल आणि आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याबरोबर आपले नातेही अधिक दृढ होईल. 

पुणे :  पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्‍टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन तो सनदी अधिकारीही झाला. वैभव विधाते हा पेपर विक्रेता आज चिपळूण नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत आहे. 

वैभव आणि त्यांची भावंडे लहानपणापासूनच वडिलांच्या दुर्गामाता पेपर एजन्सीचे काम करत. हडपसर परिसरात घरोघरी पेपर टाकत. घरी हलाखीची परिस्थिती नव्हती, तरीही स्वत: कष्ट करून शिकण्याचे संस्कार वडील कैलाश विधाते व आई सिंधू यांच्याकडून त्यांना मिळाले होते.

वैभव यांनी शिकून केवळ अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले नाही, तर आयुष्यात प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण करण्यावर भर दिला. त्यामुळे 2013 मध्ये पहिल्यांदा जव्हार नगर परिषद येथे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत एका स्पर्धेत या नगर परिषदेला 5 कोटी रुपयांचे बक्षीसही मिळाले. त्यांची बहीण डॉ. वैशाली भागवतही पेपर स्टॉल सांभाळून डॉक्‍टर झाली व आज राज्य सरकारच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे. भाऊ विशाल हा सुद्धा फार्मासिस्ट असून पुण्यात मेडिकल व्यवसाय करत आहे. पेपर विक्रीच्या व्यवसायाच्या बळावर विधाते कुटुंबातील तिन्ही भावंडे उच्चशिक्षित झाली आहेत. 

 

Web Title: Success Story of NewsPaper r Vendor to Administrative Officer