बंडोबांना थंड करण्यात नेत्यांना यश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पुणे - पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने जोशात येऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या बहुसंख्य बंडोबांना शांत करण्यात प्रमुख राजकीय पक्षांना मंगळवारी यश आले. तब्बल 751 उमेदवारांनी मंगळवारी (ता. 7) एका दिवसात माघार घेतली. त्यामुळे 162 जागांसाठी 1102 उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता बुधवारपासून प्रचाराच्या रणधुमाळीला जोर येणार आहे. 

पुणे - पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने जोशात येऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या बहुसंख्य बंडोबांना शांत करण्यात प्रमुख राजकीय पक्षांना मंगळवारी यश आले. तब्बल 751 उमेदवारांनी मंगळवारी (ता. 7) एका दिवसात माघार घेतली. त्यामुळे 162 जागांसाठी 1102 उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता बुधवारपासून प्रचाराच्या रणधुमाळीला जोर येणार आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपली. त्या दरम्यान भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक बंडखोरांचे अर्ज मागे घेण्यात या राजकीय पक्षांना यश आल्याचे सांगण्यात आले. 

अधिकृत उमेदवारांशिवाय अन्य इच्छुकांनी भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सर्वच पक्षांनी राजकीय यंत्रणा कार्यान्वित केली होती. त्यासाठी सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत इच्छुकांशी संपर्क साधण्यात येत होता. अर्ज भरलेले इच्छुक "आउट ऑफ रेंज' जाणार नाहीत, याचीही त्यासाठी काळजी घेण्यात आली. इच्छुकांशी समजूत घालताना मध्यस्थ, नातेगोते, आमदार, खासदार यांचीही मदत राजकीय पक्षांनी घेतली; तर काही जणांची अधिकृत उमेदवारांनी "समजूत' घातल्याचीही चर्चा होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रभाग समिती व वृक्ष प्राधिकरणाचे सदस्यत्व आदी विविध पदांचा त्यांना शब्द देण्यात येत होता. 

महापालिका निवडणुकीसाठी छाननीनंतर 1853 उमेदवारी अर्ज शिल्लक होते. त्यातील 751 उमेदवारांनी माघार घेतल्याने 1102 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. येरवडा क्षेत्रीय कार्यालयातून सर्वाधिक 115, तर धनकवडीतून 45 इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली. 

भारतीय जनता पक्षाच्या बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या 90 टक्के उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याही बहुतेक इच्छुकांनी पक्षाच्या आवाहनाला प्रतिसाद देत उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे पक्षाच्या शहराध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांनीही पक्षाच्या आवाहनाला बहुतेक इच्छुकांनी प्रतिसाद दिल्याचे सांगितले. 

माघार घेतलेले प्रमुख इच्छुक 
भाजप ः श्‍याम सातपुते, सतीश बहिरट, ज्योत्स्ना सरदेशपांडे, ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी, गिरीश भेलके, अनुपमा लिमये, हिरामण शिंदे, हेमंत देशपांडे, आशा बिबवे, सुश्‍मिता चौधरी, राजेंद्र खेडेकर, रावसाहेब मोरे 

राष्ट्रवादी ः महादेव पठारे, सतीश म्हस्के, प्रवीण तुपे, संतोष फरांदे, नितीन कदम, डॉ. दत्तात्रेय गायकवाड, संजीवनी जाधव, डॉ. सुनीता मोरे, डॉ. शंतनु जगदाळे, रंजना मोरे, वर्षा पवार, मृणालिनी वाणी, नीलेश नवलाखा, पुष्पा गाडे 

कॉंग्रेस ः जयश्री बागूल, नुरुद्दीन सोमजी, ज्ञानेश्‍वर मोझे, अमृता गायकवाड, शिवाजी बांगर, प्रकाश वैराट, स्वाती कथलकर, सचिन आडेकर, द. स. पोळेकर, प्रियंका पवार, भाग्यश्री काची, सोनी डांगी, चंचला फासगे. 

भोसलेंच्या उमेदवारीला बहिरटांचे आव्हान 
रेश्‍मा भोसले यांना कायद्याचे उल्लंघन करून बहाल करण्यात आलेली भाजपची उमेदवारी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी कॉंग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या (ता. 9) सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. 

Web Title: successful leaders pmc election