... अन्‌ ‘ती’ ताठ मानेने उभी राहिली

... अन्‌ ‘ती’ ताठ मानेने उभी राहिली

पुणे - थोडीथोडकी नाही तर, १३ वर्षे पाठीवर बाक घेऊन ती चिमुकली जगली. पाठीला आलेल्या बाकाचा तिला त्रास होत असे. त्यावर शस्त्रक्रिया हाच उपाय. पण, त्याचा खर्च मोठा होता. पैसा आणायचा तरी कुठून? हा शिरूर तालुक्‍यातील रामलिंग गावी राहणाऱ्या बळिराजाला पडलेला प्रश्‍न. त्याचे उत्तर ससून रुग्णालयाच्या रूपाने मिळाले. ससून रुग्णालय या शेतकऱ्यासाठी आशेचा किरण ठरला आणि ती ताठ मानाने उभी राहिली.

संबंधित मुलीच्या पाठीच्या बाकावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याने त्यासाठी आवश्‍यक वैद्यकीय चाचण्या ससून रुग्णालयात सुरू झाल्या. ‘एक्‍स-रे’, ‘एमआरआय’, ‘सिटी स्कॅन’ झाले. त्या मुलीच्या पाठीत दोन ठिकाणी बाक असल्याचे निदान झाले. त्यानंतर शस्त्रक्रियेची दिशा ठरली. पाठीचे बाक घालविण्यासाठी २४ स्क्रू वापरण्यात आले. त्यातून ती ताठ उभी राहू शकली.

शस्त्रक्रियेदरम्यान मज्जारज्जू व नसांना धक्का लागू नये व पायाची ताकद जाऊ नये यासाठी अत्याधुनिक ‘न्यूरोमॉनिटरिंग’ सुविधा वापरण्यात आली. ही शस्त्रक्रिया पाच तास सुरू होती. कमीत कमी रक्तस्राव व्हावा, याची दक्षता यात घेतली. रुग्ण मुलगी ही आता ताठ कण्याने व मानाने उभी आहे व चालत आहे. 

वरिष्ठ मणकाविकार तज्ज्ञ आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. मणकाविकार तज्ज्ञ डॉ. अंबरीष माथेशूळ, डॉ. सुशांत घुमरे व भूल तज्ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. योगेश गवळी व डॉ. रोहित संचेती यांचा समावेश होता. 

पाठीला बाक येण्याचा आजार वयाच्या ५ ते १५ वर्षांच्या मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यातून पाठ वाकते. शरीराची उंची कमी होते. पायाला व कमरेला कमजोरी येते. वय वर्षे १० ते १४ या दरम्यान उपचार घेतल्यास पाठ सरळ करता येते. ही सुविधा ससून रुग्णालयात उपलब्ध असून महात्मा फुले जन आरोग्य योजना व वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक विभाग यांच्या मदतीने शस्त्रक्रिया माफक खर्चात होते.
- डॉ. अजय चंदनवाले,  अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com