
जुन्या काडेपेट्या जमा करणारा बारामतीचा अवलिया
बारामती : अनेक वर्षांपूर्वीच्या जुन्या काडेपेटीच्या रिकाम्या डब्या जमा करून त्याला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देण्याचे काम बारामतीतील सुधीर वालचंद शहा यांनी केले आहे. त्यांच्याकडे 1960 पासूनच्या जुन्या 350 हून अधिक रिकाम्या काड्यापेटी आहेत. या काडेपेट्या पाहिल्यानंतर जुना काळ कसा होता याचे चित्र नजरेसमोर उभे राहते. त्यांनी अतिशय महत्त्वाचा हा ठेवा गेल्या अनेक वर्षांपासून जतन करून ठेवला आहे.
लहान असताना त्यांना काडेपेटीच्या रिकाम्या पेट्या जमा करण्याचा छंद होता. त्यांनी हा छंद पुढे कायमस्वरूपी जोपासला. काळाप्रमाणे जी स्थित्यंतरे झाली, त्यानुसार काडीपेटीवरची चित्रे देखील कशी बदलत गेली, याचा इतिहास सुधीर शहा यांच्या या ठेव्यातून समोर उलगडतो. अत्यंत रंजक अशा स्वरूपाचा हा इतिहास असून काळानुरूप कसे बदल होत गेले हे या निमित्ताने समोर येते.
भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळेस तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी नागरिकांना आयुधासाठी निधी जमा करण्याचे केलेले आवाहन असलेली काडेपेटी, दारूचे शरीरावर होणारे दुष्परिणाम यांचे चित्र रेखाटणारी काडेपेटी, पोस्ट ऑफिस मध्ये बचत खात्याच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याबाबतचे आवाहन, कुटुंबनियोजनाचा संदेश प्रसारित करणाऱ्या चित्राची काडीपेटी, राष्ट्रीय बचत पत्रांवर मिळणाऱ्या व्याजाची माहिती देणारी काडीपेटी, अशा अनेक स्वरूपाच्या रिकाम्या काडेपेट्या सुधीर शहा यांनी जमा केल्या आहेत.
काळ कशा पद्धतीने बदलत गेला हे या काडेपेट्या पाहिल्यानंतर सहजतेने जाणवते. साठच्या दशकापासून ते आता 2020 च्या दशकापर्यंत जे बदल घडत गेले ते बदल यानिमित्ताने समाजासमोर येतात. अतिशय दुर्मिळ अशा काडेपेट्या सुधीर शहा यांनी जमा केल्या असून हा मौल्यवान ठेवा त्यांनी असंच जतन करून ठेवणे गरजेचे आहे.
आठवीत असल्यापासून मला हा छंद लागला त्यानंतर मी वेगवेगळ्या प्रकारच्या काडेपेट्या जमा करत गेलो त्यातून आज माझ्याकडे साडेतीनशेहून अधिक विविध संदेश प्रसारित करणाऱ्या काडेपेटी आहे.
- सुधीर शहा, बारामती