साखर उद्योगाची ‘गोडी’ यंदा वाढणार

साखर उद्योगाची ‘गोडी’ यंदा वाढणार

भवानीनगर - पेट्रोल, डिझेलच्या गगनाला भिडलेल्या भावावर ‘स्वदेशी’ तडका म्हणून जुलै महिन्यात केंद्र सरकारने उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीला परवानगी दिल्यानंतर इथेनॉलच्या दरात घसघशीत वाढ करीत ऊस उत्पादकांना खूश केले आहे. उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर ४७.५० रुपयांवरून थेट ५९.५० रुपयांवर नेऊन ठेवला असून साखर उद्योगासाठी आता ‘सनराईज इंडस्ट्री‘ चे स्वप्न साकारले आहे. 

आज सकाळी हा निर्णय मंत्रीसमितीने जाहीर केला. वास्तविक पाहता गेल्या चार दिवसांपासून या निर्णयाकडे साखर उद्योगाचे डोळे लागून राहिले होते. अपेक्षेपेक्षाही केंद्राने दरवाढ करून साखर उद्योगांना खूष केले आहे. याचा पर्यायाने फायदा ऊस उत्पादकांना मिळणार आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोलियम पदार्थाने वाढलेल्या दराने केंद्र सरकारला टिकेचा भडीमार सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. दीड महिन्यापूर्वी सरकारने इंधनाच्या वापरापोटी भरमसाठ भराव्या लागणाऱ्या परदेशी चलनावर उपाय व साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिली होती. विक्रमी साखर उत्पादन हेही त्यामागचे एक कारण होते. यासंदर्भात सरकारने २६ जुलै २०१८ रोजी निर्णय जाहीर केला होता. एक टन साखर म्हणजे ६०० लिटर इथेनॉल ही तुलना करीत बहुतांश साखर ही इथेनॉलकडे वळाल्यास देशातील साखर व इंधनाच्या मागणी-पुरवठ्याचे संतुलन साधण्याचा एक प्रयत्न या निर्णयातून केंद्र सरकारने केला आहे. 

एकंदरीत ब्राझीलच्या धर्तीवर आता देशातील साखर कारखाने सोईनुसार साखर व इथेनॉल निर्मितीचे पर्याय स्वीकारतील. आता इथेनॉलचे दर वाढीव ठेवल्याने कारखान्यांनाही इथेनॉलवर भर देणे सहजशक्‍य होणार आहे. येणाऱ्या हंगामात देशात ३३० लाख टनांहून अधिक साखर उत्पादनाचा अंदाज असून साखरेऐवजी सध्या पुरवठ्यापेक्षा वाढलेली इथेनॉलची १५० कोटी लिटरची गरज भागविण्याची बेरीज केंद्राने साधली आहे. पेट्रोलियम कंपन्या व मंत्रालयाचे सहकार्य यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. 

यावर्षी देशातील संभाव्य साखर उत्पादन - ३५०-३५५ लाख टन
यावर्षी गाळपासाठी उसाचे क्षेत्र ११.४२ लाख हेक्‍टर.
देशातील साखर कारखाने ५६२
आसवनी निर्मिती करणारे कारखाने -१५०
देशातील इथेनॉलची मागणी ३१३ कोटी लिटर
देशातील सध्या साखर कारखान्यांची उत्पादनाची क्षमता - १६५ कोटी लिटर
आतापर्यंतचा थेट इथेनॉल खरेदीचा दर प्रतिलिटर ४७.५० रुपये
आजपासून थेट इथेनॉलचा दर प्रतिलिटर ५९.५० रुपये 
आधीचा बी हेवी इथेनॉलचा दर प्रतिलिटर ४७.५० रुपये
आधीचा बी हेवी इथेनॉलचा दर प्रतिलिटर ५२.४२ रुपये

योग्य वेळी घेतलेला उत्तम निर्णय आहे. साखर उद्योग हा सनराईज इंडस्ट्री आहे हे जे बोलले जात होते. ते प्रत्यक्षात साकारणारा निर्णय आहे. या निर्णयामुळे आता देशातील अधिकाधिक साखर कारखाने इथेनॉल निर्मिती करतील व राष्ट्राच्या परकीय चलनाच्या बचतीत मोठे योगदान देतील. इथेनॉलचा दर खूप चांगला ठरवलेला आहे.
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय साखर संघ

अतिशय चांगला निर्णय आहे. साखर कारखान्यांना उसाच्या ज्यूसपासून थेट इथेनॉल करता येईल. थोडीशी यंत्रणेत सुधारणा करावी लागेल, परंतु बहुतांश कारखाने हे करू शकतील. इथेनॉलच्या दराचा विचार करता आज ४५०० ते ४६०० रुपयांचे उत्पन्न एक टन उसापासून मिळेल अशी व्यवस्था सरकारने करून ठेवली आहे, असे म्हणता येईल.
- आर. एस. नाईक, माजी सचिव, राज्य इथेनॉल असोसिएशन

फायदा काय होणार?
 पेट्रोल- डिझेलमध्ये १० टक्‍क्‍यांपर्यंत इथेनॉल मिसळण्याची परवानगी आहे. सद्यस्थितीत केवळ २ टक्‍क्‍यांपर्यंत मिसळले जाते, मात्र भरीव दरामुळे आता कारखाने मोठ्या संख्येने इथेनॉल निर्मितीत उतरतील.
 साखर उत्पादनाच्या विक्रमी आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर इथेनॉल निर्मितीकडे ऊस वळविल्यास साखर उत्पादनही वाजवी राखण्यात व बाजारभाव योग्य राखण्यास मदत होणार.
 एक टन उसापासून ७५ ते ८० लिटर इथेनॉल उत्पादन, त्यामुळे सध्याच्या आकडेवारीनुसार एका टन उसापासून कारखान्यांना ४५०० ते ४६०० रुपये मिळणार.
 प्रक्रिया खर्चाचे १ हजार ते ११०० रुपये वगळले तर ३४०० ते ३५०० रुपये ऊस उत्पादकांसाठी मिळू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com