आता रंगणार साखर कारखाना निवडणुकांचे फड

Prachar
Prachar

सोमेश्‍वरनगर (पुणे) : विधानसभा निवडणुकांचा भर ओसरत असतानाच आता कारखान्यांच्या निवडणुकांचे फड रंगणार आहेत. पुणे जिल्ह्यातील अकरा सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका मार्च ते जून 2020 या कालावधीत होणार असून, काही कारखान्यांच्या मतदार याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये छत्रपती, घोडगंगा, सोमेश्‍वरच्या निवडणुका लक्षवेधी असतील. मात्र सर्वाधिक रंगतदार निवडणूक "माळेगाव'चीच होणार आहे.

राज्यात सरकार भाजपचे की कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे येणार यावर कारखान्याच्या निवडणुकांचे सूत्र अवलंबून होते. भाजप सरकार आले, तर सर्व कारखान्यांच्या निवडणुका एकाच वेळी लावून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला कात्रजचा घाट दाखवायचा मनसुबा होता. मात्र सत्तेचे फासे उलटे पटले आणि परिणामी मतदारयाद्या प्रसिद्धीचा कार्यक्रम निवडणूक प्राधिकरणाने लागलीच हाती घेतला. त्यामुळे आता ज्या तारखेला मतमोजणी होऊन विद्यमान संचालक मंडळ अस्तित्वात आले होते, त्याच तारखेला पुन्हा नव्या मतमोजणीची तारीख येईल, अशा अनुषंगाने कार्यक्रम लावण्यासाठीची प्रक्रिया आखली जात असल्याचे समजते.

साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकांच्या संभाव्य तारखाही काढल्या गेल्या आहेत. तसे झाल्यास हर्षवर्धन पाटलांच्या नीरा-भीमाच्या निवडणुकीने साखरपट्टा दणाणायला सुरुवात होईल आणि दिलीप वळसे पाटलांच्या "भीमाशंकर'च्या निवडणुकीने समाप्ती होईल. 2019-20 चा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच घडामोडी घडणार असल्याने एफआरपी, ऊसतोड नियोजन, अर्थव्यवस्था या बाबी संवेदनशील ठरणार आहेत.

या पार्श्‍वभूमीवर नीरा भीमा, विघ्नहर, संत तुकाराम कारखान्यांच्या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी सांगितले, की माळेगावच्याही मतदार याद्या तयार असून, त्या काही दिवसांतच प्रसिद्ध होतील. आमच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष असेल असेल. "सोमेश्‍वर'चे अधिकारी सुभाष धुमाळ यांनी सांगितले, की "सोमेश्‍वर'च्याही याद्या साखर आयुक्तालयाने मागविल्या असून, आठवडाभरात प्रसिद्ध होतील.

कारखाना व कंसात निवडणुकीची संभाव्य तारीख पुढीलप्रमाणे ः नीरा भीमा (23 मार्च), विघ्नहर (1 एप्रिल), संत तुकाराम (2 एप्रिल), माळेगाव (4 एप्रिल), सोमेश्वर (17 एप्रिल), राजगड (15 एप्रिल), कर्मयोगी (27 एप्रिल), छत्रपती (27 एप्रिल), घोडगंगा (12 मे), भीमा पाटस (21 मे), भीमाशंकर (8 जून).

दिग्गजांचा कस लागणार
दिलीप वळसे पाटील, ऍड. अशोक पवार, संग्राम थोपटे, राहुल कुल या नवनिर्वाचित आमदारांसह हर्षवर्धन पाटील, विदुरा नवले, सत्यशील शेरकर यांच्यासारखे बडे नेते कारखान्यांचे थेट अध्यक्षच आहेत. याशिवाय अजित पवार, चंद्रराव तावरे, दत्तात्रेय भरणे, संजय जगताप, रमेश थोरात, पृथ्वीराज जाचक, सतीश काकडे हे दिग्गजही या खडाखडीत उतरणार आहेत. मात्र सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक "माळेगाव'चीच होईल. चंदरराव तावरे व रंजन तावरे या गुरुशिष्याच्या आघाडीकडेच माळेगाव राहणार की राष्ट्रवादी पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com