Sugarcane ethanol : राज्यातील साखर उद्योगाची ‘ब्राझील’च्या दिशेने वाटचाल; शेखर गायकवाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sugar industry moving towards Brazil Shekhar Gaikwad Investment of 20 thousand crores for ethanol

Sugarcane ethanol : राज्यातील साखर उद्योगाची ‘ब्राझील’च्या दिशेने वाटचाल; शेखर गायकवाड

पुणे : महाराष्ट्रातील साखर कारखाने आता साखर उत्पादन कमी करून त्याऐवजी इथेनॉल, वीज, आसवनी, बायोगॅस आदींसह विविध उपपदार्थांची निर्मिती करण्यासाठी मोठा पुढाकार घेऊ लागले आहेत. यामुळे यंदाच्या ऊस गळीत हंगामात साखर उत्पादन कमी होऊन, इथेनॉल उत्पादनात भरीव वाढ झाली आहे.

राज्यात इथेनॉल निर्मिती प्रकल्पांसाठी सुमारे २१ हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. परिणामी राज्यातील साखर उद्योगाची वाटचाल ही ‘ब्राझील’च्या दिशेने सुरु झाली आहे, असल्याचे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी (ता.४) सांगितले.

चालू गळीत हंगामात साखर कारखान्यांनी १६ लाख टन साखर ही इथेनॉल निर्मितीकडे वर्ग केली आहे. यामुळे यंदा इथेनॉलचे २४४ लाख कोटी लिटर इतके विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी हेच उत्पादन २२६ लाख कोटी लिटर इतके होते.

त्यात यंदा १८ लाख कोटी लिटरने वाढ झाली आहे. पूर्वी साखर कारखान्यांमध्ये फक्त साखरेचेच उत्पादन होत होते.आता साखर कारखान्यांमधून वीज,आसवानी, इथेनॉल, बायोगॅस आदी प्रमुख उपपदार्थांसह सुमारे ३५ उपपदार्थांची निर्मिती करणे शक्य आहे.

गायकवाड म्हणाले, ‘‘दरम्यान साखर कारखाने आता इंधन निर्मितीचे कारखाने होऊ लागले आहेत. कापूस, सोयाबिननंतर ऊस हे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे पीक झाले आहे. कारखान्यांचे रँकिंग केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पोषक वातावरण तयार झाले आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यानंतर गॅसोलिन तयार होते.

परदेशात गॅसोलिनचे प्रमाण वाढले आहे. येत्या चार ते पाच वर्षात गॅसोलिन वापराचे प्रमाण आपल्याकडेही वाढेल. शिवाय पेट्रोलच्या तुलनेत गॅसोलिनची किंमत कमी असल्याने ग्राहकांचीच मागणी वाढेल.’’

राज्यातील १६३ साखर कारखान्यांनी आसवनी प्रकल्प उभारणी सुरू केली आहे. यामध्ये ५४ सहकारी साखर कारखाने, ७१ खासगी साखर कारखान्यांच्या आणि ३८ स्वतंत्र (स्टँड अलोन) आसवनी प्रकल्पांचा समावेश आहे.

टॅग्स :sugarEthanol