
Pune : साखर उद्योगात राज्यात यंदा एक लाख कोटींची उलाढाल
पुणे : राज्यातील साखर उद्योगात यंदाच्या वर्षात १ लाख ८ हजार कोटींची वार्षिक उलाढाल झाली आहे. आगामी तीन वर्षात हीच उलाढाल अडीच लाख कोटींपर्यंत जाऊ शकते. यामुळे भविष्यात महाराष्ट्राला साखर उद्योगाचे जागतिक नेतृत्व करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शुक्रवारी (ता.२६) येथे बोलताना व्यक्त केली.
साखर आयुक्त गायकवाड हे येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्ताने वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनतर्फे (विस्मा) आज गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात ‘महाराष्ट्र राज्य साखर उद्योगाचा भविष्यवेध’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी साखर संचालक उत्तम इंदलकर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक शशी प्रकाश, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, सरचिटणीस पांडुरंग राऊत, कार्यकारी संचालक अजित चौगुले आदी उपस्थित होते.
शेखर गायकवाड पुढे म्हणाले, ‘‘अनेक सरकारी अधिकाऱ्यांना मागच्या फाइल बघून पुढची कामे करण्याची सवय असते. मात्र, त्यांच्यासमोर मांडण्यात येणाऱ्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून कामे मार्गी लावण्याची सवय आत्मसात करणे आवश्यक आहे. यासाठी सरकारी पातळीवरील कामात नावीन्यपूर्ण गोष्टींचा अवलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणे, साखर कारखान्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. आजपर्यंत साखर उद्योगात शंभरपेक्षा जास्त नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कार्यकाळात साखर उद्योग क्षेत्राला सकारात्मक निर्णायक वळण मिळाले आहे. त्यांनी या उद्योगांसाठी फायदेशीर ठरणारे अनेक निर्णय घेतले आहेत. साखर कारखान्यांचे चार वर्षांपूर्वीचे ताळेबंद आणि गायकवाड यांच्या निर्णयानंतरच्या ताळेबंदात मोठा फरक दिसून येत आहे. त्यांच्या कार्यकाळात साखर उद्योगाने उद्योग जगतात भरारी घेतली. त्यांनी साखर संघाबरोबरीने ‘विस्मा’लासुद्धा सरकार दरबारी स्थान प्राप्त करून दिले, असे मत ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी यावेळी व्यक्त केले.