साखर उत्पादन मागणीपेक्षा कमी

ज्ञानेश्‍वर बिजले - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

महाराष्ट्राला मागे सारून उत्तर प्रदेश प्रथम; शिल्लक साठ्यामुळे चणचण नाही 
पुणे - ‘साखर उत्पादनात देशात प्रथम‘ हा किताब गेली अनेक वर्षे मिरविणाऱ्या महाराष्ट्राला दुष्काळाच्या तडाख्याने यंदा दुसऱ्या क्रमांकावर जावे लागणार असून, उत्तर प्रदेश तो मान मिळविणार आहे. मात्र, महाराष्ट्रामागोमाग कर्नाटक या प्रमुख साखर उत्पादक राज्यातही साखरेचे उत्पादन घसरल्याने मागणीपेक्षा उत्पादन कमी अशी स्थिती देशात येईल. तरीही साखरेच्या शिल्लक साठ्याने देशवासीयांना साखरेची चणचण भासणार नाही. 

महाराष्ट्राला मागे सारून उत्तर प्रदेश प्रथम; शिल्लक साठ्यामुळे चणचण नाही 
पुणे - ‘साखर उत्पादनात देशात प्रथम‘ हा किताब गेली अनेक वर्षे मिरविणाऱ्या महाराष्ट्राला दुष्काळाच्या तडाख्याने यंदा दुसऱ्या क्रमांकावर जावे लागणार असून, उत्तर प्रदेश तो मान मिळविणार आहे. मात्र, महाराष्ट्रामागोमाग कर्नाटक या प्रमुख साखर उत्पादक राज्यातही साखरेचे उत्पादन घसरल्याने मागणीपेक्षा उत्पादन कमी अशी स्थिती देशात येईल. तरीही साखरेच्या शिल्लक साठ्याने देशवासीयांना साखरेची चणचण भासणार नाही. 

उत्तर प्रदेशात 2015-16 या हंगामात 68 लाख टन साखरेची निर्मिती झाली. येत्या ऑक्‍टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात तेथे 75 लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात येत्या हंगामात साखरेचे उत्पादन 50 लाख टन होईल. उत्तर प्रदेशातील साखरेच्या लागवडीचे क्षेत्र महाराष्ट्राच्या तुलनेत तिप्पटीहून अधिक आहे. उत्तर प्रदेशात 23.1 लाख हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. महाराष्ट्रात यंदा उसाचे क्षेत्र 6.33 लाख हेक्‍टर आहे. महाराष्ट्रातील एकरी उत्पादन आणि साखरेचा उतारा चांगला असल्याने, येथे उत्पादन होणाऱ्या साखरेचे प्रमाण देशातील एकूण साखर उत्पादनाच्या एक तृतीयांश आहे. 

या दोन राज्यांपाठोपाठ कर्नाटकात साखरेचे उत्पादन होते. दुष्काळी स्थितीमुळे कर्नाटकातील ऊस लागवडीचे क्षेत्र 19 टक्‍क्‍यांनी घटले आहे. त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होईल. तेथे गेल्या वर्षी 40.7 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. कर्नाटकात 2016-17 मध्ये 31.9 लाख टन साखरेचे उत्पादन होईल. 

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) देशातील ऊस क्षेत्राचे सॅटेलाइट इमेजद्वारे सर्वेक्षण केले. देशातील पुढील हंगामातील साखर उत्पादनाविषयीचा अंदाज त्यांनी दिल्लीत काल जाहीर केला. त्यात या महत्त्वाच्या तीन राज्यांतील उत्पादनाच्या आकडेवारीसह सर्व राज्यातील अंदाजे उत्पादन जाहीर केले. 

तमिळनाडूतील साखरेचे उत्पादन दोन लाख टनांनी वाढून 15.6 लाख टन होईल. गुजरात, हरियाना, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यात दरवर्षीएवढे साखरेचे उत्पादन होईल. बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड या राज्यांत एकूण 13.5 लाख टन साखरेचे उत्पादन होईल. 

इस्माच्या अंदाजानुसार देशात यंदा साखरेचे 234 लाख टन उत्पादन होईल. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील साखरेचे अंदाजे उत्पादन 62 लाख टन गृहीत धरले आहे. मात्र, राज्यातील साखर आयुक्तालयाने यंदा साखरेचे उत्पादन 50 लाख टन होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे देशातील एकूण साखरेचे उत्पादन 220 ते 225 लाख टन होईल, असा अंदाज आहे. 

साखर शिल्लक राहील 
गाळप हंगाम ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होत असताना, देशात साखरेचा प्रारंभीचा शिल्लक साठा 75 लाख टन असेल. 2016-17 मध्ये देशातील साखरेचा खप अंदाजे 256 लाख टन आहे. यंदा मागणीच्या तुलनेत उत्पादन घटणार असले, तरी शिल्लक साठा विचारात घेता देशातील साखरेची गरज भागून पुढील वर्षी (2017-18) पुरेशी साखर शिल्लक राहील, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे.

Web Title: Sugar production in less than demand