सरकार स्थापन होईना; ऊसतोड मजुरांना काम मिळेना

PNE2
PNE2

कारखान्याचे गाळप हंमागास विलंब; मजुरीसाठी वणवण करण्याची वेळ

सोमेश्वरनगर (पुणे) ः दिवाळी सण उरकून ऊसतोडणी मजूर साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल होऊ लागले आहेत. आधी कोरड्या आणि नंतर ओल्या दुष्काळाला तोंड दिलेले मराठवाडा, विदर्भातील हे मजूर रोजगाराची काकुळतीने वाट पाहत आहेत. मात्र, सरकार स्थापनेसाठी होत असलेल्या विलंबामुळे हंगामही लांबत आहे.

मागील वर्षी पाऊस नसल्याने आणि या वर्षी पाऊस लांबल्याने अगोदर विदर्भ, मराठवाड्याला दुष्काळाने पोळले. नंतरच्या जोरदार पावसाने पिकेही वाया गेली. अशा परिस्थितीत ऊसतोड मजुरांना रोजगार कारखान्यांवर मिळेल, अशी खात्री होती. मात्र, परतीच्या पावसाने कारखान्यांचा हंगाम महिनाभर लांबला. आता मागील चार दिवसांत पावसाने उघडीप दिली असून, थंडी पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे ऊसतोड मजुरांना कारखाने सुरू होतील, अशी आशा वाटू लागली आहे. परंतु, सरकारच्या अखत्यारीतील मंत्री समितीने गाळप हंगाम सुरू करण्याची अधिकृत तारीख निश्‍चित करणे आवश्‍यक असते. परंतु, आचारसंहितेआधी सरकार निर्णय घेण्यात अपयशी ठरले आणि आता सरकार स्थापनेस मुहूर्त मिळेना, यामुळे मंत्री समितीची बैठक पुढे ढकलली जात आहे. या विलंबामुळे कारखाने, शेतकरी यांच्यासह ऊसतोड मजूरही अस्वस्थ झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर ऊसतोड मजूर तारखेची वाट न पाहता दिवाळी उरकून कारखान्यांच्या दिशेने रवाना होऊ लागले आहेत. सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पाडेगाव (ता. फलटण),वाठार कॉलनी (ता. खंडाळा),मांडकी (ता.पुरंदर) आदी ठिकाणी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या येऊन दाखल झाल्या आहेत. काही ठिकाणी ऊसतोड मजूर कारखाना सुरू होण्याआधी उसाच्या गुऱ्हाळावर ऊसतोडीचे काम करून चार पैसे पदरात पाडत आहेत. तर, अन्य ठिकाणी मजूर शेतात काम मागत फिरत आहेत, तर त्यांची मुले खोप्या सांभाळत आहेत.मात्र,शेतात पाणी असल्याने काम मिळणेही मुश्‍कील झाले आहे.

ऊस बागायतदार सोमनाथ सोरटे म्हणाले,""थंडीच्या दिवसांत ऊसतोड मजुरांचा जादा व्यवसाय होतो. ऊन वाढल्यावर काम करणे अशक्‍य असते.''


"धुराडं कवा पेटणार?'
सोमेश्वर कारखान्याच्या तळावरील ऊसतोड मजुरांची सुमारे पन्नास कुटुंबे आहेत.यातील संतोष पिसाळ म्हणाले,""कारखान्याचं धुराडं कवा पेटणार, ह्याची वाट बघतोय. बैलं संभाळायचं अवघड झालंय. चारा मिळत नाय.'' जळगाव जिल्ह्यातून आलेले हिरामण चव्हाण, संजय भिल म्हणाले, ""गावाकडं पावसानं थोडंच पीक हाती लागलं. इथं येऊन काम मिळंल म्हणून लवकर आलोय.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com