शेतकरी संघटनांमुळे नव्हे; टंचाईमुळे वाढली उसाची गोडी

ज्ञानेश्वर रायते : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

भवानीनगर - यंदाच्या हंगामात शेतकरी संघटनांच्या कृपेने नाही, तर उसाच्या टंचाईमुळे उत्पादकांना न मागता हप्ते जाहीर होऊ लागले आहेत. खासगी कारखान्यांच्या स्पर्धेत सहकारी कारखान्यांचा जीव गुदमरू लागल्याची टीकाही होऊ लागली आहे. कारण, काहीही असले तरी ऊस उत्पादकांच्या घामाला दाम मिळण्यासाठी कारखान्यातील स्पर्धा शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे.

भवानीनगर - यंदाच्या हंगामात शेतकरी संघटनांच्या कृपेने नाही, तर उसाच्या टंचाईमुळे उत्पादकांना न मागता हप्ते जाहीर होऊ लागले आहेत. खासगी कारखान्यांच्या स्पर्धेत सहकारी कारखान्यांचा जीव गुदमरू लागल्याची टीकाही होऊ लागली आहे. कारण, काहीही असले तरी ऊस उत्पादकांच्या घामाला दाम मिळण्यासाठी कारखान्यातील स्पर्धा शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे.

या वर्षी पहिल्या हप्त्याचा "भाव' अजूनही फुटलेला नाही. पुणे जिल्ह्यातही सरकारी स्टाइलने एक बैठक पार पडली आणि शेतकरी संघटना स्टाइलने ती निष्फळही ठरली. प्रत्यक्षात आतापर्यंत हिरिरीने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात रान उठवत एकेरी भाषा वापरणाऱ्या शेतकरी संघटनांची बोलती बंद झाली आहे. कारण, मुख्यमंत्र्यांना काय वाटेल, याचीच चिंता या संघटनांना पडल्याने ऊस उत्पादक मात्र वाऱ्यावर आहेत. अशा स्थितीत यंदाचा कमी उसाचा हंगाम शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. या वर्षी उसाची कमतरता असल्याने बहुतेक सर्वच कारखान्यांनी "गेटकेन' उसावर भिस्त ठेवली आहे. पुढील हंगामात सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात गाळपक्षमतेपेक्षा अधिक ऊस असल्याने फक्त यंदाचा हंगाम कसातरी पार पाडायचा, असा कारखान्यांचा विचार आहे. त्यामुळे एकापेक्षा एक सरस भाव कारखाने देऊ लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांचे पदाधिकारी एका आमदारासह इंदापूर तालुक्‍यात दोन-तीन दिवस तळ ठोकून आहेत. हे पदाधिकारी ऊस उत्पादकांची प्रत्यक्ष भेट घेऊन 2500 रुपयांहून अधिक पहिला हप्ता देऊ, असे आश्वासन देत आहेत. काही खासगी कारखान्यांनी फ्लेक्‍सही लावलेले आहेत. काही ठिकाणी कारखान्यांचे शेतकी अधिकारी शेतकऱ्यांना हप्त्याच्या पावत्या दाखवून ऊस कारखान्याकडे वळवित आहेत.
या पळवापळवीत ऊस उत्पादकांना पहिल्यांदाच अनेक पर्याय मिळाल्याने जिथे अधिक हप्ता तिथे आपला ऊस, असे समीकरण मनाशी बांधून शेतकऱ्यांनी फड मोकळे करण्यास सुरवात केली आहे. परजिल्ह्यातील कारखान्यांकडून उसाची वाढती मागणी पाहून पुणे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने मात्र अस्वस्थ झाले आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस सर्रास बाहेर जात असल्याने या हंगामातील प्रक्रिया खर्चात होणारी वाढ कशी रोखायची, हा प्रश्न कारखान्यांपुढे निर्माण झाला आहे.

छत्रपती वाढविणार हप्ता?
उसाच्या पळवापळवीची लागण छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाली आहे. उसाच्या हप्त्याच्या वाढत्या स्पर्धेत कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जात असल्याने कारखान्याने अगोदर निश्‍चित केलेल्या 2400 रुपये हप्त्यात आणखी वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेण्याचे ठरविल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजले आहे. "एफआरपी'पेक्षा अधिक हप्ता म्हणजे प्राप्तिकराची टांगती तलवार असल्याने सरकारने लवकर हस्तक्षेप केल्यास अधिकाधिक हप्ता कारखाने देऊ शकतात, असे मत या कारखान्याच्या एका ज्येष्ठ संचालकाने व्यक्त करत छत्रपती या हंगामात समाधानकारक भाव देणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान, संचालकांनी यापूर्वी निश्‍चित केलेल्या 2400 रुपयांच्या हप्त्यात आणखी वाढ करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे या संचालकाने सांगितले. काही कारखाने 2500, 2550 रुपये पहिला हप्ता देण्याचे आमिष दाखवीत असल्याने कारखान्यास नंतर जाहीर करावयाची रक्कम आधीच जाहीर करावी लागेल, असे दिसते.

Web Title: Sugarcane price increased because scarcity