Accident News : उसाचा ट्रक व स्कार्पिओ गाडीचा भीषण अपघात; पाच जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 sugarcane truck and Scorpio car accident Five people were injured pune

Accident News : उसाचा ट्रक व स्कार्पिओ गाडीचा भीषण अपघात; पाच जण जखमी

मंचर : मंचर जवळअवसरी फाटा ते पारगाव रस्त्यावर अवसरी फाट्यापासून (ता.आंबेगाव) पूर्वेला ५०० मीटर अंतरावर स्कार्पिओ गाडी व उसाचा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात स्कार्पिओ गाडीतील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी खेड तालुक्यातील निघोजे व ठाकूर पिंपरी येथील आहेत.

रविवारी (ता.१९) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अपघात झाला. अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी ताबडतोब मदत करून जखमींना मंचर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

चालक संतोष सोपान पवार (वय ४०), अपर्णा संतोष पवार (वय ३६), अदिती संतोष पवार (वय १० सर्व रा.निघोजे ता.खेड), प्राजक्ता प्रदीप ठाकूर (वय २७), ज्ञानदा प्रदीप ठाकूर (वय ३ सर्व रा.ठाकूर पिंपरी ता.खेड) अशी जखमींची नावे आहेत.

हे सर्वजण पिंपळगाव खडकी (ता.आंबेगाव) येथे असलेले त्यांचे नातेवाईक सेवानिवृत्त ज्ञायाधीश देवराम अरगडे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांना भेटून अवसरी खुर्दमार्गे निघोजे गावाकडे स्कार्पिओ गाडीतून (एम.एच १४ डी.एन ८५५६) जात होते.

दरम्यान विरुद्ध दिशेने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकची (एम.एच.०४ एफ ७७२५) व स्कार्पिओ गाडीची समरसमोर धडक झाली. दोन्ही गाड्या फरफटत दहा ते बारा फुट पुढे गेल्या. स्कार्पिओ गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला असून ट्रकच्याही चालकाच्या बाजूचा भाग निकामी झाला आहे. अपघात झाल्यानंतर स्कार्पिओ गाडीत अडकलेल्या गंभीर जखमींना बाहेर काढणे अवघड झाले होते.

स्थानिक ग्रामस्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, बाळासाहेब भोर, संदीप भोर, विलास काळे, विकास भोर, शिवराज भोर, गौरव भोर, अर्जुन काजळे यांनी स्कार्पिओमध्ये अडकलेल्या पाच जणांना बाहेर काढण्यासाठी स्कार्पिओचा पुढील भाग तोडून टाकला. त्यानंतर त्यांना सुखरूप बाहेर काढले.

गणेश शिंदे व गौरव बारणे ह्या रुग्णवाहिका चालकांनी सर्व जखमींना मंचर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.अपघातामुळे वाहतूक बंद पडल्याने भोरमळ्यातून पारगाव, मंचर व पुणे भागातील वाहतूक सुरु करण्यात आली. दरम्यान ट्रकचालक पळून गेला आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून रीतसर पंचनामा केला आहे. रस्तात उभी असलेली अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करत होती. ट्रकचालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :policeaccident