विक्रमी उसामुळे साखर कारखानदारांची कोंडी    

shugarcane
shugarcane

माळेगाव (पुणे) : पश्‍चिम महाराष्ट्रासह विदर्भ व मराठवाड्यात पुरेशा पावसामुळे यंदाच्या हंगामात गाळपासाठी उसाची उपलब्धता वाढली आहे. एका बाजूला विक्रमी ऊस गाळपाचे आव्हान, तर दुसऱ्या बाजूला ऊसतोडणी मजूर व वाहतूकदारांनी दरवाढीसाठी घेतलेला आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यात कोरोनाचे संकट वेगळेच आहे. परिणामी खासगीसह बहुतांशी सहकारी साखर कारखानदार आपल्या कारखान्याला आगामी हंगामात गाळपासाठी ऊस पुरवायचा कसा, या चिंतेत आहेत. 

साखर कारखान्यांना 15 ऑक्‍टोबर 2020 पासून ऊस गाळपासाठी परवानगी मिळू शकते. खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी आतापासूनच गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे. गतवर्षी उसाची टंचाई होती. त्यामुळे राज्यात 60 लाख टन साखर उत्पादन झाले, परंतु यंदा उसाचे क्षेत्र लक्षणीय वाढल्याने शंभर लाख टनांपेक्षा अधिक उत्पादन मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तोडणी मजुरांबरोबर हार्वेस्टर मशिनलाही महत्त्व येणार आहे, अशी शक्‍यता सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांच्यासह जाणकारांनी वर्तवली आहे. 

ऊस तोडणी मजुरांसह वाहतूकदार संघटनेने दरवाढीसाठी नगर जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे. सध्याच्या दराच्या किमान दीडशे टक्के म्हणजे किमान एक हजार रुपये टन दर मिळण्याखेरीज कोयता हातात घेणार नाही, अशी भूमिका मजूर, मुकादमांनी घेतली आहे. त्यांचे नेतृत्व माजी मंत्री सुरेश धस करीत आहेत. तशीच भूमिका पुणे जिल्हा ट्रक- ट्रॅक्‍टर ऊस वाहतूदार संघटनेची आहे. कर्नाटकच्या तुलनेत वाहतुकीत 50 टक्के दरवाढ व कमिशन 20 टक्‍क्‍यांऐवजी चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत वाढवावे, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भोसले यांनी केली. 

विक्रमी उसाचे गाळप वेळेत उरकण्यासाठी व शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळण्यासाठी शासनस्तरावर योग्य त्या उपाययोजनांची अंमलबाजावणी वेळीच होण्यासाठी शेतकरी संघटनांनी दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने बंद पडलेले साखर कारखाने सुरू होण्यासाठी त्यांना कर्ज स्वरूपात काही मदत करता येते का, याबाबत हालचाली सुरू केल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले. 

गतवर्षी उसाची टंचाई असल्याने वाहतूकदार व मजूरांवर दराच्याबाबतीत अनेक कारखान्यांनी अन्याय केला. यंदा उसाचे क्षेत्र अधिक असताना दरवाढीच्या प्रश्नावर मजूर व वाहतूकदार संघटित झाले आहेत. या प्रश्नांची जाण आणि आत्मियता ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आहे. त्यांनी शासनस्तरावर तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा. 
 - शिवाजीराव भोसले, पुणे जिल्हा अध्यक्ष, ट्रक- ट्रॅक्‍टर ऊस वाहतूदार संघटना

ऊसतोडणी मजूर व वाहतूकदार हे साखर उद्योगातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे संबंधितांच्या मागण्या आणि साखर उद्योगाची सध्याची अर्थिक स्थिती विचारात घेऊन राज्याचा साखर संघ, आंदोलनकर्त्यांचे नेते योग्य तो मार्ग काढतील, त्याकामी पवारसाहेबांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. 
- बाळासाहेब तावरे, अध्यक्ष, माळेगाव सहकारी साखर कारखाना 

कोरोनाची पार्श्वभूमी व विक्रमी उस उत्पादनामुळे यंदाचा हंगाम आव्हानात्मक आहे. त्यामुळे तोडणी मजुरांच्या आरोग्याची काळजी कारखानास्तरावर घेणे खूप महत्त्वाचे आहे. पवारसाहेबांना साखर उद्योगाविषयी अधिक जाण आहे. त्यामुळे शासनाबरोबर साखर संघ, आंदोनलकर्त्यांचे प्रतिनिधी आणि पवारसाहेब जो निर्णय घेतील, तो सर्वच कारखानदारांना बंधनकारक राहणार आहे. 
- पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com