मावस बहिण-भावाने केली आत्महत्या; आत्महत्येपूर्वी भावाची फेसबुक पोस्ट

डी. के. वळसे पाटील
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

अक्षय अशोक जाधव (वय 24, रा. खडकी, ता. आंबेगाव) व ऋतुजा उत्तम तट्टू (वय 19, मूळ गाव मंगरूळ पारगाव, ता. जुन्नर, सध्या रा. खडकी) या सख्ख्या मावस भाऊ व बहिणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी (ता. 13) पहाटे ही घटना खडकी-पिंपळगाव (ता. आंबेगाव) येथे घडली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

मंचर : अक्षय अशोक जाधव (वय 24, रा. खडकी, ता. आंबेगाव) व ऋतुजा उत्तम तट्टू (वय 19, मूळ गाव मंगरूळ पारगाव, ता. जुन्नर, सध्या रा. खडकी) या सख्ख्या मावस भाऊ व बहिणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी (ता. 13) पहाटे ही घटना खडकी-पिंपळगाव (ता. आंबेगाव) येथे घडली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी भावाने आत्महत्येपूर्वी फेसबुकवर पोस्ट टाकली होती.

मंचरच्या जवळ सहा किलोमीटर अंतरावर खडकी गाव आहे. अक्षय व ऋतुजा या दोघांच्या मामाचे गाव खडकी आहे. दोघांचेही वास्तव्य खडकी येथेच होते. अक्षय हा मुंबई येथे नोकरीला होता. सोमवारी (ता. 12) रात्री खडकी येथे आला होता. ऋतुजा मंगळवारी पहाटे तीन वाजता बेपत्ता झाल्याची खबर तिचे वडील उत्तम तट्टू यांनी मंचर पोलिसांकडे दिली होती.

दरम्यानच्या काळात पोलिस पाटील मंगल पोखरकर यांनी खडकी स्मशानभूमीजवळ धोंडिभाऊ हरिभाऊ पोखरकर यांच्या विहिरीत तरुण व तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना कळविली होती. पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, हवालदार सागर गायकवाड, राजेंद्र हिले, विनोद गायकवाड, सुनील शिंदे, दिनेश माताडे, गणेश तेली घटनास्थळी भेट दिली. त्या वेळी दोघांनीही एकमेकांना ओढणीने बांधून आत्महत्या केल्याचे दिसून आले. संजय दोरे या तरुणाने विहिरीत उतरून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह दाखल केले. डॉ. कैलास भागवत यांच्यासह वैद्यकीय पथकाने शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide By Cousin