गळफास घेणाऱ्याचे पोलिसांनी वाचविले प्राण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

बेरोजगारी व कुटुंबीयांसमवेत सातत्याने होणाऱ्या भांडणास कंटाळून एका तरुणाने आपल्या मित्राला मोबाईलद्वारे व्हिडिओ कॉल लावून गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मित्राने प्रसंगावधान राखत नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन, तरुणाच्या गळ्याला बांधलेला दोर सोडून त्याचे प्राण वाचविले. ही घटना शनिवारी रात्री शिवणे येथील दांगट इस्टेट भागात घडली.

पुणे - बेरोजगारी व कुटुंबीयांसमवेत सातत्याने होणाऱ्या भांडणास कंटाळून एका तरुणाने आपल्या मित्राला मोबाईलद्वारे व्हिडिओ कॉल लावून गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मित्राने प्रसंगावधान राखत नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन, तरुणाच्या गळ्याला बांधलेला दोर सोडून त्याचे प्राण वाचविले. ही घटना शनिवारी रात्री शिवणे येथील दांगट इस्टेट भागात घडली.

उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पथक शनिवारी रात्री परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते. मध्यरात्री दोनला एक तरुण त्यांच्याकडे धावत आला. त्याने त्याचा मित्र गळफास घेऊन आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ पोलिसांना दाखविला. पोलिसांनी संबंधित तरुणाचा पत्ता विचारून तेथून तत्काळ त्याच्या घरी धाव घेतली.

इमारतीची लिफ्ट येण्यास उशीर लागत असल्यामुळे पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलिस कर्मचारी दत्तराम भिंडेकर, अजित शेंडगे यांनी पायऱ्यांवरून धावत पाचव्या मजल्यावरील त्याचे घर गाठले. त्यानंतर त्यास आवाज दिला. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी दरवाजा तोडून, घरामध्ये प्रवेश केला. त्या वेळी पंख्याला बांधलेला दोर तत्काळ सोडून खाली उतरवून त्याचे प्राण वाचविले.

बेरोजगारी व कुटुंबाशी सतत होत असलेल्या भांडणामुळे कुटुंबीय सोडून गेले, त्यामुळे आत्महत्या करण्याचे ठरविले होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, पोलिसांनी एक ते दोन तास त्याच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारून त्याचे समुपदेशन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide Trying Youth Life Saving by Police