उन्हाळी शिबिरांचे वाढतेय प्रस्थ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

उपक्रमांची चौकशी करून निर्णय घेण्याची आवश्‍यकता

पिंपरी - अलीकडे सुटी व शिबिरे हे जणू समीकरणच बनले आहे. दिवाळी सुटी असो की, उन्हाळी  सुटी. काही मुले नियमित अशा शिबिरांना जातात.

उपक्रमांची चौकशी करून निर्णय घेण्याची आवश्‍यकता

पिंपरी - अलीकडे सुटी व शिबिरे हे जणू समीकरणच बनले आहे. दिवाळी सुटी असो की, उन्हाळी  सुटी. काही मुले नियमित अशा शिबिरांना जातात.

त्यामुळे मागील काही वर्षांत व्यावसायिक शिबिरांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. मात्र, ही शिबिरे खरोखरच शैक्षणिक, विविध क्षेत्रांची माहिती देणारी किंवा विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाला कलाटणी देऊ शकणारी व कौशल्य वृद्धिंगत करणारी आहेत का? हे तपासले जाणे आवश्‍यक आहे. 
सध्या शहरात ठिकठिकाणी उन्हाळी शिबिरांचे फलक पाहायला मिळत आहेत. त्याकडे पालकवर्ग मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहे. ही सुटी ‘कॅश’ करण्याच्या दृष्टीने बहुतांश शाळांनीच शिबिराचे आयोजन केले आहे.

त्यामध्ये डान्स, ड्रामा, पेंटिंग, गायन अशा कलावर्गाचा समावेश आहे. तर, बहुतांश ॲडव्हेंचर,  स्पोर्टस क्‍लबतर्फे जिम्नॅस्टिक, ॲथलेटिक्‍स, क्रीडा प्रशिक्षण शिबिरे सुरू केली आहेत. बऱ्याच संस्था काहीतरी वेगळे देत आहोत असे भासविण्यासाठी जंगल सफारी, गिर्यारोहण अशी शिबिरेही भरवीत आहेत. त्या पलीकडेही केवळ पैशाची उलाढाल करण्याच्या उद्देशाने शिबिरांचे आयोजन करून पालकांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे. आपला पाल्य ज्ञानी व्हावा, त्याने विविध विषयांत प्रावीण्य मिळवावे, या अपेक्षेने अनेक पालक वाटेल तेवढी फी भरून शिबिरांना पाठवून देतात. मुलांचा नेमका कल पाहण्याचीही तसदी पालक घेत नाहीत. 

अनेकदा गिर्यारोहण, प्राणीनिरीक्षण, पक्षीनिरीक्षणाच्या मोठ मोठ्या घोषणा करून प्रत्यक्षात शिबिरामध्ये कोणतेच उपक्रम घेतले जात नाही. त्याऐवजी केवळ विद्यार्थ्यांना काही ठिकाणं दाखविण्याचे काम केले जाते. खर्चामध्ये काटकसर करून निभावून नेण्याचे प्रकारही शिबिरामधून घडतात.

आकर्षक प्रचार
हॅंडबिल, फलक, जाहिरातीतून शिबिरांचा प्रचारही जोरदार केला जातो. शिबिरात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रभावीपणे माहिती दिली जाते. अमुक इतक्‍या तारखेपर्यंत नोंदणी करा अन्यथा प्रवेश मिळणार नाही, असे सांगून शिबिराचे महत्त्व वाढविले जाते. लवकर नाव नोंदविण्यास फीमध्येही सवलत जाहीर केली जाते. नेमक्‍या याच प्रलोभनांना पालक बळी पडतात.

शिबिर कसे असावे... 
विद्यार्थ्यांचे गणित, सायन्स व इंग्रजी विषयांची तयारी करून घेणारे - विद्यार्थ्यांना जड वाटणारे हे विषय सोप्या व सुटसुटीत भाषेत शिकवून त्या विषयांची विद्यार्थ्यांना गोडी लावणारे
मुलांच्या आवडीनिवडी पाहून त्यांच्यासाठी गायन, नृत्य, चित्रकला, संपर्क साधण्याची कला व व्यक्तिमत्त्व विकास करणारे
विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारण्यासाठी खास वर्ग असावेत
वैयक्तिक स्वच्छता, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी याबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे
कृषी, विविध पिके, पर्यावरण, वन, वन्यप्राणी इत्यादीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणारे 

पालकांनी हे करावे
शिबिराची संपूर्ण चौकशी करूनच मुलांना प्रवेश घ्यावा
पाल्याचा नेमका कल, आवड विचारात घ्यावी
पाल्य शिबिरामध्ये रमत आहे किंवा नाही हे पाहावे
नियोजनबद्ध असे कोणते कार्यक्रम हाती घेणार? त्याची रूपरेषा कशी? शिबिरामध्ये मार्गदर्शन कोणत्या विषयातील व कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती करणार, याची बारकाईने माहिती घ्यावी.

अलीकडे उन्हाळी शिबिरांचे ‘फॅड’ आले आहे. शिबिरांच्या नादात मुलांचे मुक्त खेळणे थांबले आहे. एकाच सुटीत पाल्याला पाच-सहा शिबिरांना घालणारे अनेक पालक आहेत. ही सुटी मुलांना मुक्तपणे खेळण्याबागडण्यासाठी असते. त्यातून मुलांच्या विचार व व्यक्तिमत्त्व विकासाला वाव मिळतो. मात्र, शिबिरांच्या माध्यमातून त्यांच्यावर विचार लादले जातात. शिबिरांचे व्यावसायीकरण बंद होणे आवश्‍यक आहे. पालकांनीही सजग व्हावे.
- प्रा. शैलजा सांगळे

Web Title: summer camp increase