सुसह्य उन्हाळ्यासाठी पाणीकपात अपरिहार्यच

ज्ञानेश्‍वर बिजले
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

शहरामध्ये पाणीकपात करावीच लागणार आहे. तो निर्णय लांबणीवर टाकून उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यानंतर पाणीकपात करण्याऐवजी हिवाळ्यात पाण्याची मागणी कमी असताना पाणीकपात करणे अधिक योग्य ठरेल. जलसंपदा विभागाने अभ्यासाअंती शहरात दहा टक्के पाणीकपात करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने त्यावर अधिक चिंतन करीत बसण्यापेक्षा अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने पावले उचलल्यास, हिवाळ्यात वाचविलेले पाणी उन्हाळ्यात उपयोगात आणता येईल.

शहरामध्ये पाणीकपात करावीच लागणार आहे. तो निर्णय लांबणीवर टाकून उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यानंतर पाणीकपात करण्याऐवजी हिवाळ्यात पाण्याची मागणी कमी असताना पाणीकपात करणे अधिक योग्य ठरेल. जलसंपदा विभागाने अभ्यासाअंती शहरात दहा टक्के पाणीकपात करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने त्यावर अधिक चिंतन करीत बसण्यापेक्षा अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने पावले उचलल्यास, हिवाळ्यात वाचविलेले पाणी उन्हाळ्यात उपयोगात आणता येईल.

पुण्यात पाणीपुरवठ्यात घट करण्याच्या मुद्द्यावरून सध्या सत्ताधारी पक्षातच वादंग उठले आहे. मात्र, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पाणी उपलब्ध आहे. पुणेकर घेत असलेले जादा पाणी कमी करण्यावरून तेथे वाद आहे. ते पाणी शेतीला सिंचनासाठी देण्याचा जलसंपदा विभागाचा आग्रह आहे. तेथे पाणी आहे, वाद वाटपावरून आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेत उलट स्थिती आहे. पवना धरणातच पाणी कमी आहे, त्यामुळे कपात करा, असा स्पष्ट आदेश जलसंपदा विभागाने पावसाळ्यातच दिला. या धरणाशिवाय शहराला अन्य कोणताच जलस्रोत नाही. चार ऑक्‍टोबरपासून आजपर्यंत त्याबाबत महापालिकेने निर्णयच घेतला नाही, तो प्रशासनाने घेतला पाहिजे, राजकीय नेतृत्वावर सोपविण्याची आवश्‍यकता नाही.

जलसंपदा विभागाच्या सांगण्यानुसार ते धरणातून जून २०१९ अखेरपर्यंत नेहमीप्रमाणे पाणी पुरवू शकतात. या विभागाच्या नियमानुसार १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी धरणात साठा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. त्या पंधरा दिवसांचा साठा धरणांत शिल्लक ठेवण्यासाठी सध्या दहा टक्के पाणी कमी घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांपुढे जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्याचाही प्रश्‍न आहे. कारण, एल निनोच्या शक्‍यतेमुळे पुढील वर्षी पावसाळा लांबण्याचा अंदाज आहे, त्यामुळे जलसंपदा विभागाला पंधरा दिवसांच्या पाण्याची, तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तीस दिवसांच्या पाण्याची चिंता लागून राहिली आहे.

महापालिका धरणातून रोज ४८० ते ४९० दशलक्ष लिटर (एमएलडी), तसेच एमआयडीसीतून ३० एमएलडी पाणी घेते. म्हणजे रोज ५१० ते ५२० एमएलडी पाणी वितरित करते. जुलैमधील पंधरा दिवसांचा विचार केल्यास सुमारे साडेसात हजार एमएलडी आणि महिना विचारात घेतल्यास १५ हजार एमएलडी पाणी कमी पडणार आहे. ते पाणी डिसेंबर ते जून या सात महिन्यांत वाचवावे लागणार आहे. दरमहा तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला तर २१ दिवसांचे पाणी वाचेल. दर आठवड्याला एक दिवस पाणी बंद ठेवल्यास, महिन्याभराचा पाणीसाठा वाचेल. हिवाळ्यात जर पाणीकपात केली नाही, तर मार्च ते जून या चार महिन्यांत कपातीचे प्रमाण वाढवावे लागेल.

महापालिकेची वितरण व्यवस्था सक्षम नसल्याचे नवरात्राच्या काळात दिसून आले. धरणातून पुरेसे पाणी मिळत असताना वितरणातील त्रुटीमुळे पाणीपुरवठा विस्कळित होतो आहे. एप्रिलमध्ये पाण्याची मागणी वाढते, ती पुरविण्याची क्षमता महापालिकेच्या सध्याच्या यंत्रणेची नाही. त्या वेळी चक्राकार पद्धतीने आठवड्यातून एक दिवस एका भागातील पाणीपुरवठा बंद ठेवता येईल. मात्र, उन्हाळ्यात पाणीकपात वाढविल्यास नागरिकांना अडचणी येऊ शकतात.

धरणातून रोज ८०० एमएलडी पाणी सोडले जाते. त्यातील पाचशे एमएलडी पाणी महापालिका घेते. उर्वरित पाणी एमआयडीसी, अन्य गावांच्या पाणीपुरवठा योजना व शेतकरी घेतात. महिन्यातून दोन- तीन दिवस धरणांतून सोडण्यात येणारे पाणी बंद ठेवल्यास, बचत मोठ्या प्रमाणात होईल. पुढील सात महिन्यांत धरणांतून वीस दिवस पाणी सोडले नाही, तर जुलै महिन्यासाठीही शहराला पाणी उपलब्ध होईल. जलसंपदा विभाग त्याला तयार आहे. महापालिकेनेच त्याबाबतचा निर्णय लवकर घेण्याची आवश्‍यकता आहे. हिवाळ्यात पाणी कपात जास्त केल्यास, उन्हाळा थोडा सुसह्य होईल.

Web Title: Summer Water Shortage