सनबर्न फेस्टिव्हलचा मंच खाक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

वाघोली - सनबर्न फेस्टिव्हलचा मुख्य मंच सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास लागलेल्या आगीत खाक झाला. सेट काढण्याचे काम सुरू असताना वेल्डिंगच्या ठिणगीमुळे थर्माकोलने पेट घेतल्याने ही आग लागली. अग्निशमन दलाच्या एका बंबाने अर्ध्या तासात आग आटोक्‍यात आणली. मात्र, पाणी संपल्यामुळे पुन्हा आग भडकली व उर्वरित मंचही जळाला. 

केसनंद (ता. हवेली) येथे 28 ते 31 डिसेंबर दरम्यान सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी भव्य मंच उभारण्यात आला होता. 31 डिसेंबर रोजी कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मंच काढण्याचे काम सुरू होते. मंचासाठी थर्माकोल, प्लायचे डिझाइन बनविण्यात आले होते. मंच काढण्याचे काम सुरू असताना वेल्डिंगही सुरू होते. त्याची ठिणगी थर्माकोलवर पडल्याने आग लागली. हवेमुळे आग भडकली. तेथे आग विझविण्यासाठी कोणतीही यंत्रणा, पाणी टॅंकर अथवा अग्निशामक दलाचे वाहन नसल्याने मंच जळून खाक झाला. पावणेएकच्या सुमारास अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी आला. त्याने अर्ध्या तासात आग विझविली. त्यामुळे उर्वरित थर्माकोलचा मंच वाचला होता. मात्र, पाणी संपल्याने बंब गेल्यानंतर आगीने पुन्हा पेट घेतला व उर्वरित मंचही जळून खाक झाला. यामुळे तेथे लोखंडी बारचा सांगाडा राहिला. तोही कोसळण्यास सुरवात झाली होती, परंतु बार अडकल्याने तो कोसळला नाही. मात्र बार आगीने खराब झाले. कर्मचाऱ्यांनी शक्‍य तेवढे प्लायवूड तेथून हलविले. 

आयोजकांची अरेरावी 
आगीचे छायाचित्र व व्हिडिओ शूटिंग करणाऱ्यांना तेथील बाउंसरने अरेरावी केली. रस्त्यातही बाउंसर थांबविण्यात आले होते. हे बाउंसर तेथून जाणाऱ्यांचे मोबाईल तपासून त्यातील छायाचित्रे व व्हिडिओ डीलिट करीत होते. पत्रकारांच्या मोबाईलमधीलही छायाचित्रे व व्हिडिओ त्यांनी डीलिट केले. 

Web Title: Sunburn Festival main stage was consumed by fire

टॅग्स