
वेताळ टेकडीच्या संवर्धनासाठी रविवारी आंदोलन
पुणे : कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वेताळ टेकडी येथून बोगदा व रस्ता तयार केला जाणार असल्याने त्याविरोधात पर्यावरणप्रेमी नागरिकांतर्फे उद्या (ता. १) सकाळी साडेसात वाजता वेताळ टेकडीवरील मारुती मंदिर येथे निषेध अभियान आयोजित केले आहे.
पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात वेताळ टेकडीमधून दोन बोगदे, दोन रस्ते दाखविण्यात आले आहेत, हे प्रकल्प करण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. पण यामुळे टेकडीची जैवविविधता नष्ट होणार आहे. हवामान बदलाचे परिणाम दिसायला सुरवात झालेली आहे, पुणेकरांना त्याचा त्रास होत आहे. असे असताना शहराच्या मध्यवर्ती भागातील वनसंपदा असलेली टेकडी फोडून रस्ते करणे व डोंगर पोखरून बोगदा करणे यामुळे प्रचंड हानी होणार आहे असा आरोप करत शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.
यामध्ये सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट, परिवर्तन, मिशन ग्राउंड वॉटर, ग्रीन पुणे मूव्हमेंट, डेक्कन जिमखाना परिसर समिती, पाषाण एरिया सभा, औंध विकास मंडळ, पंचवटी उत्कर्ष सेवा संस्था, बाणेर पाषाण लिंक रोड विकास समिती, असोसिएशन ऑफ नगर रोड सिटिझन फोरम, वसुंधरा स्वच्छता अभियान, देवनदी स्वच्छता अभियान, रामनदी स्वच्छता अभियान, ५१ ए ग्रुप, जीवितनदी, परिसर, कल्पवृक्ष, वॉरिअरर्स मॉम्स, आनंदवन फाउंडेशन या संघटना या आंदोलनात सहभाही होणार आहेत.
‘‘या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. याचा अभ्यास करून आम्ही महापालिकेला सादर केला, पण त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. हा प्रकल्प अवास्तव आहे, त्यामुळे त्यास विरोध करत आहोत, नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे.’’असे आवाहन पर्यावरणप्रेमी पुष्कर कुलकर्णी यांनी केले आहे.
Web Title: Sunday Agitation Conservation Vetal Hill Tunnel Vetal Hill Solve Traffic Congestion Karve Road And Law College Road
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..