रविवारच्या मुहूर्तावर रणधुमाळी

रविवारच्या मुहूर्तावर रणधुमाळी

पुणे - वेळ सकाळी अकराची... नेहरू रस्त्यावर एकमेकांसमोरून आलेल्या पदयात्रा... त्यातून कार्यकर्त्यांना चढलेला जोर... वेळ दुपारी साडेबाराची... टिळक रस्ता... अपक्ष उमेदवार आणि एकाच पक्षाचे उमेदवार यांच्या समोरासमोर आलेल्या रिक्षा... त्यातून रंगलेला संवाद. रविवारच्या सुटीचे निमित्त साधून सर्वच उमेदवार ताकदीने प्रचारात उतरल्याचे चित्र दिसले. वाजत-गाजत रस्त्या-रस्त्यावरून निघालेल्या चारही उमेदवारांच्या एकत्रित पदयात्रा, घरोघरी जाऊन मतदारांना भेटणारे उमेदवार, जागोजागी त्यांना होणारे औक्षण आणि त्याच वेळी पक्षाच्या आणि काही ठिकाणी उमेदवाराच्या नावाने होणारा जयघोष... अशा वातावरणात रविवारी सुटीच्या दिवशी निवडणूक प्रचार शिगेला पोचल्याचे दृश्‍य शहरात जागोजागी दिसत होते. 

महापालिकेची निवडणूक मंगळवारी (ता. २१) होत आहे. प्रचारासाठी अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आजच्या सुटीचा फायदा घेत घरी असलेल्या प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा कसोशीने प्रयत्न उमेदवार करत असल्याचे चित्र रविवारी बहुतांश प्रभागांमधून दिसत होते. निवडणुकीच्या प्रचारात रंगत भरू लागली आहे. त्यात आज रविवार. पुढच्या रविवारी (ता. १९) सायंकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचे सोने करण्यासाठी उमेदवारांनी दिवसभर प्रचारावर भर दिला. एकाच पक्षाच्या बहुतांश उमेदवारांनी एकत्रित प्रचार केल्याचेही दिसून आले. भाजपच्या उमेदवारांनी स्वच्छ भारत अभियान रविवारी राबविले. सुटी असल्यामुळे नातेवाईक आणि मित्रमंडळी असे सर्वच आज उमेदवारांच्या मदतीला धावून आल्याचे दिसत होते. एक उमेदवार गेला नाही की दुसरा उमेदवार येऊन हात जोडून जात असल्याचा अनुभव आज मतदारांना मिळाला. पदयात्रेदरम्यान कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी पाण्याच्या बाटल्या, वडापाव अशा अनेक गोष्टी पुरविल्या जात होत्या. दुपारच्या वेळेत भोजनाची खास व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळ होताच पुन्हा पदयात्रा सुरू झाली. ‘संडे बोले तो.. फूल डे प्रचार’ अशाच पद्धतीने उमेदवारांकडून नियोजन करण्यात आले होते.

सकाळपासून उमेदवारांच्या पदयात्रा रस्त्या- रस्त्यांवरून निघाल्या होत्या. त्यात उमेदवाराबरोबर पक्षाचे झेंडे घेऊन पदयात्रेत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. उमेदवाराच्या नावाने जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमत होता. काही उमेदवारांनी पदयात्रांमध्ये सुरवातीला तालवाद्यांच्या पथकाची साथ घेतली होती. सोसायट्यांमधील लहान मुलेदेखील यात सहभागी होत असल्याचे निरीक्षणातून स्पष्ट होते. 

दुपारपर्यंत प्रचाराची ही धामधूम पुणेकरांनी अनुभवली. दुपारी उन्हाचा चटका वाढल्याने या पदयात्रांनी विश्रांती घेतली. मात्र रिक्षांमधून होणारा प्रचाराचा जोर कायम होता. या प्रचाराला उडत्या चालीच्या गाण्यांची साथ मिळाली. मतदारसंघांमधून या रिक्षा, टेम्पो दिवसभर फिरत होते. दुपारी चार वाजल्यानंतर उन्हाची तीव्रता कमी झाली आणि पुन्हा पदयात्रांना गती आली. शहराच्या मध्यवस्तीतील पेठांबरोबरच उपनगरांमधूनही प्रचाराचे हे रंग भरल्याचे दिसत होते. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आलेला हा पहिलाच रविवार होता, त्यामुळे मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांनी पदयात्रांबरोबरच घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्यावर भर दिला. सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य यांच्याबरोबरही त्यांनी संवाद साधला.

प्रचार फेऱ्यांमुळे वाहतूक कोंडी 
काही ठिकाणी उमेदवारांच्या पदयात्रांमुळे वाहतूक कोंडी होताना दिसत होती. परंतु, पदयात्रा पुढे सरकल्यावर वाहतूक पूर्ववत होत होती. काही ठिकाणी कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने वाहतुकीचे नियमन करताना दिसत होते, त्यामुळे कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना थोडाफार दिलासा मिळत होता. 

घोषणांनी परिसर दुमदुमला
डोक्‍यावर टोप्या, गळ्यात उपरणे, हातात झेंडा अशा पदयात्रा गल्लीबोळांतून ‘काकू हाय का घरात, घड्याळ आले दारात’.. ‘येऊन येऊन येणार कोण.. पंजाशिवाय हायेच कोण’.. ‘अर्रर... घुमतेय काय... शिवसेनेशिवाय जमतेय काय’... ‘इकडून आले.. तिकडून आले... कमळ आले’ अशा घोषणा पदयात्रांमध्ये देण्यात येत होत्या, त्यामुळे परिसर दुमदुमून गेला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com