उमेदवारांनी साधले सुटीचे औचित्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

पिंपरी - रविवारच्या सुटीचे औचित्य साधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी प्रचारफेरी, पदयात्रा आणि दुचाकी फेरीद्वारे मतदारांशी संपर्क साधला.

पिंपरी - रविवारच्या सुटीचे औचित्य साधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी प्रचारफेरी, पदयात्रा आणि दुचाकी फेरीद्वारे मतदारांशी संपर्क साधला.

उमेदवारी मिळाल्यानंतर खऱ्याअर्थाने प्रचाराला रंग आला आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार सकाळी वैयक्तिक; तर संध्याकाळी पॅनेलमधील चारही जण एकत्रित प्रभागात मतदारांच्या भेटीगाठी घेत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी जेथे पुरुष उमेदवार आहेत, तेथे त्यांची पत्नी व इतर नातेवाईकही वैयक्तिक प्रचार करताना दिसून येत आहेत. याशिवाय रात्रीच्या वेळी सोसायट्यांमध्ये बैठकीचे आयोजन करून मतदारांना हवी असलेली कामेही करून दिली जात आहेत. पुढील रविवारी (ता. १९) सायंकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता होणार 

असल्याने रविवारी कार्यकर्ते आणि मतदारांना सुटी असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला. काही कार्यकर्त्यांसह शक्‍तिप्रदर्शन करत परिसरातून पदयात्रा काढली. काहींनी मोटारीत उभे राहून ध्वनिक्षेपकावरून घोषणाबाजी करत मतदारांना अभिवादन केले; तर काहींनी आपल्याला तरुणांची पसंती आहे, हे दाखविण्यासाठी प्रभागातून दुचाकी फेरी काढली.

काही उमेदवारांनी सकाळी प्रचारफेरी काढली; तर सायंकाळी आमदार, खासदार किंवा शहराध्यक्ष या स्थानिक नेत्यांच्या मदतीने कोपरा सभांचे आयोजन केल्याचेही दिसून आले. प्रचार फेऱ्यांमध्ये लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे पाहायला मिळाले. एकाचवेळी अनेक ठिकाणी प्रचारफेरी आणि कोपरा सभा असल्याने निवडणूक विभागाच्या आचारसंहिता कक्षातील; तसेच भरारी पथकांतील अधिकाऱ्यांची चित्रीकरणासाठी धावपळ उडाली.

विद्यार्थ्यांना प्रचाराचा त्रास
बारावीची परीक्षा निवडणुकीनंतर २८ फेब्रुवारीपासून; तर दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू होणार आहे. यामुळे दहावी-बारावीचे विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. मात्र, ध्वनिक्षेपकावरून प्रचार करीत येणाऱ्या वाहनांमुळे त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत आहे. काही परिसरात दुपारच्या वेळी प्रचार करणारी वाहने येतात. एखाद्याने यास आक्षेप घेतल्यास तो विरोधी पक्षाचा माणूस आहे, असे समजून आमच्याकडे सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत प्रचाराचा परवाना असल्याचे सांगतात.

Web Title: sunday election campaign in pcmc