Vidhan Sabha 2019 : रविवार ठरला राजकीय घडामोडींचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर पहिलाच रविवार शहरात राजकीय घडामोडींचा ठरला. मतदानाच्या तारखेपर्यंत असे चार रविवार राजकीय पक्षांना मिळणार असून त्याचा फायदा प्रचारासाठी करून घेण्यावर भर राहील. 

विधानसभा 2019
पुणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर पहिलाच रविवार शहरात राजकीय घडामोडींचा ठरला. मतदानाच्या तारखेपर्यंत असे चार रविवार राजकीय पक्षांना मिळणार असून त्याचा फायदा प्रचारासाठी करून घेण्यावर भर राहील. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसबरोबरील आघाडीचे जागा वाटप जाहीर केले. तसेच त्यांनी केलेल्या आरोपांना भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले; तर काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी प्रभू श्री रामालाही भाजपच्या कारभाराची लाज वाटली असती, असे म्हणत भाजपवर टीका केली. दरम्यान, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा सोमवारी पहिल्यांदाच पुण्यात येणार असल्यामुळे तयारीसाठी शहर भाजपमध्ये वेग आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा, तर भाजपच्याही बैठका रविवारी झाल्या. ‘एमआयएम’नेही कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात हीना मोमीन यांच्या उमेदवारीची घोषणा रविवारी केली. वंचित विकास आघाडीने यापूर्वी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात डॅनिअल लांडगे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावर पहिल्याच रविवारी शहरात राजकीय घडामोडी वेगाने घडल्या. आघाडीचे जागा वाटप दृष्टिक्षेपात येत असताना युतीबद्दलची साशंकता इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढविणारी ठरली. शिवसेना कार्यकर्त्यांचेही मुंबईतील युतीच्या चर्चेकडेच लक्ष होते, तर निवडणूक रिंगणात उतरायचे की नाही, याबद्दलचा निर्णय न झाल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

राष्ट्रवादीच्या मेळाव्यापूर्वी पक्षाच्या नेत्यांची चर्चा झाली. त्यात आठही मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. तसेच काँग्रेसमध्येही मेळाव्याच्या निमित्ताने झालेल्या चर्चेत उर्वरित तीन किंवा चार मतदारसंघांतील उमेदवार कोण, याबाबत तर्क-वितर्क लढविण्यात येत होते. दरम्यान, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नड्डा पहिल्यांदाच शहरात येणार असल्यामुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यानंतरचे सलग कार्यक्रम, बैठकांचे नियोजन करण्यात भाजपचे शहर पदाधिकारी रविवारी व्यग्र होते. 

वंचित आघाडीकडून आज उमेदवारांची नावे
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचाही सोमवारी शहरात दौरा आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हेदेखील शहरात आहेत. काही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे ते जाहीर करण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunday political happenings