पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी सुनील कांबळे बिनविरोध 

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी सुनील कांबळे बिनविरोध 

पुणे - महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांच्या गळ्यात पडली. या निवडणुकीतून राष्ट्रवादी व कॉंग्रेसने माघार घेतल्याने कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर कांबळे यांना अध्यक्षपद देऊन भाजपने जातीय समीकरणे जुळविली आहे 

स्थायीच्या अध्यक्षपद निवडणुकीची प्रक्रिया महापालिकेच्या जुन्या सभागृहात झाली. या पदासाठी भाजप-शिवसेना-आरपीआयतर्फे कांबळे यांना उमेदवारी दिली होती. तर दोन्ही कॉंग्रेसने स्मिता कोंढरे यांच्या नावाची घोषणा केली होती. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच पहिल्या पाच मिनिटांत कोंढरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कांबळे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. 

महापालिकेच्या प्रभाग क्र. 36 मधून कांबळे निवडून आले आहेत. अध्यक्षपदासाठी गेल्या वर्षीच त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे स्थायीच्या सदस्यांची मुदत संपूनही कांबळे यांना संधी देत अध्यक्षपद दिले. कांबळे यांचे बंधू सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे "फिल्डिंग' लावली होती. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत दिलीप कांबळे यांना ताकद देण्यासाठीच सुनील कांबळे यांची निवड केल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, अध्यक्षपद निवडणुकीदरम्यान पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्यासह महापालिकेतील सर्व गटनेते उपस्थित होते. 

शहराच्या विकासाला प्राधान्य देणार आहे. गेल्या दोन वर्षांत उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांच्या पूर्ततेसह नव्या योजनांची अंमलबजावणी केली जाईल. पुणेकरांच्या नेमक्‍या गरजा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. या काळात विकासाचा समतोल राखणार आहे. 
- सुनील कांबळे,  नवनियुक्त अध्यक्ष, स्थायी समिती 

वाहतूक प्रश्‍नाला प्राधान्य 
महापालिका, सामाजिक संस्था, वाहतूक पोलिस आणि शाळांना सोबत घेऊन पुण्याचा वाहतूक प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे कांबळे यांनी सांगितले. 
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कांबळे यांनी "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संवाद साधला. पाणीपुरवठा, कचरा यांसारखे महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. महापालिकेत होणारा अनावश्‍यक खर्च कमी करून आणि थकबाकी वसूल करून हा निधी प्रकल्पांसाठी वापरला जाईल. महापालिकेत आर्थिक शिस्त लावण्यासाठी पालकमंत्री, पक्षनेत्यांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com