Vidhan Sabha 2019 : भाजपने डावलल्याने सुनील शेळके यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा 

Vidhan Sabha 2019 : भाजपने डावलल्याने सुनील शेळके यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा 

तळेगाव दाभाडे (पुणे) :  भाजपने विधानसभेची उमेदवारी डावलल्याने माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. जनतेच्या आग्रहाखातर विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे लढविण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यानुसार त्यांनी आज (4 ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे  भाजपला हा मोठा दणका मानण्यात येत असून, यामुळे तालुक्‍यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. 

भाजपने मावळमधून कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने शेळके नाराज झाले. अन्याय झाल्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ""गेल्या चार पिढ्या आमचे कुटुंब संघ आणि जनसंघापासून पक्षाचे प्रामाणिक काम करीत आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून तळेगावात तर संघटनेच्या माध्यमातून तालुक्‍यात कार्यरत आहे. शिक्षण, रुग्णसेवा याबरोबरच शासकीय योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून प्रयत्नशील आहे.

प्रामाणिक कार्यकर्त्याला पक्षाकडून संधी दिली जाण्याचा पायंडा मावळात प्रथमच मोडला गेला आहे. उमेदवारीसाठी मी इच्छुक होतो. यासाठी पक्षातील सर्व ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांनी भेटलो. उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींनी काय निकष लावले व आपले नेमके काय चुकले याचा बोध होत नाही. याबाबत पक्षानेही आपणाला विश्‍वासात घेतले नाही. असा निर्णय घेऊन भाजपच्याच विचारांनाच सुरुंग लागला.'' या वेळी ते काहीसे भावुक झाले. 

पक्षात शिस्तीचा अभाव 
सामान्य कार्यकर्त्यांना आपला वाटणारा भारतीय जनता पक्ष मावळात भेगडे जनता पक्ष झाला असल्याचा गंभीर आरोप सुनील शेळके यांनी या वेळी केला. केशवराव वाडेकर यांच्या निधनानंतर पक्षात शिस्तीचा अभाव जाणवत असून, पक्षाने मंत्र्यांना उमेदवारी दिली, मात्र मत कोठून आणणार असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला नाहीतर नवल. ही निवडणूक आता आपली राहिली नसून, जनतेची झाली आहे. जनता आपल्याला न्याय देईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com