परराज्यांतून अमली पदार्थांचा पुरवठा; पावणेदोन वर्षांत १७६ जणांना अटक

Crime
Crime

पुणे - अमली पदार्थविरोधी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दक्षिणेकडील राज्यांमधून गांजा, तर उत्तरेकडील काही राज्यांमधूनही ब्राऊन शुगर, कोकेन, अफीमसारखे पदार्थ राज्यात पोचविले जात असल्याचे आढळून आले आहे. मुंबईमधून मेफेड्रोन (एमडी) पुण्यात येतो. याप्रकरणी पुणे पोलिसांनी पावणेदोन वर्षांत १७६ जणांना अटक केली. यामध्ये महिलांसह परदेशी नागरिकांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

उच्चभ्रू, नोकरदार, महाविद्यालयीन तरुण ‘टार्गेट’ 
शहरातील आयटी कंपन्या, शिक्षण व रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असून, त्यामध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पुण्यातील तरुणाईची वाढती संख्या लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांत अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळ्यांकडून त्यांना ‘टार्गेट’ केले जाते. हिंजवडी, कोंढवा, कोरेगाव पार्क, लष्कर, औंध, बाणेर यांसह अन्य परिसरातून तरुणांना अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढले जाते. तसेच, शहराच्या वेगवेगळ्या भागांत होणाऱ्या पार्ट्यांमध्येही अमली पदार्थ पोचविले जातात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या राज्यांमधून होते तस्करी 
गांजासारखे अमली पदार्थ कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून तर ब्राऊन शुगर मध्य प्रदेश, राजस्थानमधून महाराष्ट्रात आणले जाते. कोकेन हा गोवा व दिल्लीतून, तर अफीम राजस्थानमधून येतो. मेफेड्रोनसारखा अमली पदार्थ मुंबईतून पुण्यासह अन्य शहरांमध्ये जात असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. 

कोट्यवधींचा माल जप्त 
पुणे पोलिसांच्या खंडणी व अमली पदार्थविरोधी पथकासह पोलिस ठाणे, गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर ‘वॉच’ ठेवून कारवाई केली जाते. पुणे पोलिसांनी २०१९ मध्ये गांजा १८५.०८५ किलोग्रॅम, एमडी ५५.७४ ग्रॅम, ब्राऊन शुगर १०१.८० ग्रॅम जप्त केली. २०२० मध्ये गांजा ३२६.२४ किलोग्रॅम, ब्राऊन शुगर २.१०२ ग्रॅम, एमडी ३५८.४७ ग्रॅम, अफीम ४.५ किलोग्रॅम, चरस ११२ ग्रॅम, कोकेन ४२४.३९ ग्रॅम जप्त केले आहे. पुणे पोलिसांसह ग्रामीण पोलिस, सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये अन्य राज्यांमधून एस्कटसी गोळ्या, एलएसडी स्टॅम्प यांसारखे वेगळे प्रकारही शहरात आणले जात असल्याचे उघड झाले आहे.

नायजेरियन नागरिकांसह महिलांचा सहभाग
पुणे पोलिसांनी पावणेदोन वर्षांमध्ये १७६ आरोपींना अटक केली. २०१९ मध्ये ११ महिलांना तर यंदा ६ महिलांना अटक केली. दरम्यान, वेगवेगळ्या कारणांनिमित्त शहरामध्ये वास्तव्य करून काही नायजेरियन व्यक्ती अमलीपदार्थ विक्रीत सहभागी असल्याच्या अनेक घटना आहेत. ग्राहक शोधण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो.

विक्रीसाठी कार, बसचा वापर
अमली पदार्थ तस्करांकडून या कामासाठी खासगी वाहनांचा वापर टाळला जातो. त्यांच्याकडून मालवाहतुकीचे ट्रक, प्रवासी जीप, कार, खासगी ट्रॅव्हल्स, एसटी बसचा वापर केला जातो. पोलिसांच्या हाती सहजासहजी लागू नये, यादृष्टीने प्रवासी व सार्वजनिक वाहतुकीचा वापर आरोपींकडून केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुणे पोलिसांनी २०१९मध्ये अमली पदार्थ विक्रीप्रकरणी ८२ गुन्ह्यांमध्ये १०९ जणांना अटक केली. या कारवाईमध्ये मागील १० वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. अमली पदार्थ विक्रीची साखळी तोडण्यासाठी ठोस उपाययोजनाही केल्या जाणार आहेत.
- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त (गुन्हे)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com