सासवडमधून पूरग्रस्तांसाठी एक लाख भाकऱ्या

श्रीकृष्ण नेवसे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

सांगली, कोल्हापूर परिसरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुरंदर तालुकाही मागे नाही. विविध गावांतून थेट व एकत्रित मदत पोचविली जात आहे. त्याशिवाय रविवारी संत सोपानकाका बॅंकेचे अध्यक्ष संजय जगताप मित्र परिवाराने केलेल्या आवाहनानुसार अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजारोंच्या संख्येने मदतीचे हात पुढे केले. एक लाखांहून अधिक भाकऱ्या, शेंगदाणा चटणी, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या 5 हजार बॉक्‍स, बिस्किटांचे पुडे दोन हजार, तर कपडे, ट्यूब पेस्ट, साबण, लोणची, पापडपर्यंत विविध प्रकारच्या उपयोगी वस्तू रवाना केल्या.

सासवड (पुणे) : सांगली, कोल्हापूर परिसरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुरंदर तालुकाही मागे नाही. विविध गावांतून थेट व एकत्रित मदत पोचविली जात आहे. त्याशिवाय रविवारी संत सोपानकाका बॅंकेचे अध्यक्ष संजय जगताप मित्र परिवाराने केलेल्या आवाहनानुसार अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजारोंच्या संख्येने मदतीचे हात पुढे केले. एक लाखांहून अधिक भाकऱ्या, शेंगदाणा चटणी, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या 5 हजार बॉक्‍स, बिस्किटांचे पुडे दोन हजार, तर कपडे, ट्यूब पेस्ट, साबण, लोणची, पापडपर्यंत विविध प्रकारच्या उपयोगी वस्तू रवाना केल्या.
सासवड मधील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात सकाळपासून मित्र परिवारातर्फे शंभरहून अधिक महिला भाकऱ्या व शेंगदाणा चटणी बनवण्यात व्यस्त होत्या. कितीतरी कट्टे बाजरी पीठ व 25 किलोहून अधिक शेंगदाण्याचा वापर यात झाला. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून विविध गावचे नागरिक, युवक, महिला मोठ्या संख्येने विविध स्वरूपाच्या विविध कपडे, साड्या, अंथरण्याची व पांघरण्याची कपडे, जीवनावश्‍यक वस्तू, भाकरी, चटणी, विविध कोरडे खाद्यपदार्थ आदी कितीतरी साहित्य घेऊन येत होते. दुपारी मदतीचा हा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढत गेला. स्नेहल काकडे, सागर जगताप, नीलेश जगताप, स्वप्नील गायकवाड, अमित पवार, नंदकिशोर कड, आकाश शिळीमकर आदी कार्यकर्ते मदत स्वीकारून पॅकबंद करून पाठवीत होते. नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष संजय ग. जगताप, नगरसेवक व कार्यकर्ते मदतीला होते. विविध गावातील महिला पुरुष, मुले, वाघिरे महाविद्यालयातील एनसीसीचे छात्र, सोपानकाका बॅंकेचे कर्मचारी, नगरपालिका सेवक, शिवरुद्र ढोलपथक, शहर पत्रकार संघ सदस्य, विविध शिक्षक संघटना, तरुण मंडळे आदींसह अनेकजण या सामाजिक कार्यात सहभागी होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Support For Flood Affected People