
Baramati News: बारामती लोकसभा मतदार संघातील पोस्ट हार्वेस्टिंग मॅनेजमेंट प्रकल्पांसाठी सहकार्य करावे; सुप्रिया सुळे
Baramati News : बारामती लोकसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोस्ट हार्वेस्टिंग मॅनेजमेंट प्रकल्पांसाठी सहकार्य करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केंद्र सरकारकडे केली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करून तसे लेखी पत्रही त्यांनी दिले.
बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये 'पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प ' उभारण्यात येणार असून कृषी विभागाच्या वतीने तसा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
हा प्रकल्प सुरु झाल्यास या चारही तालुक्यांतील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार असून शेतमाल, भाजीपाला, फळे आदींवर प्रक्रिया करणे सोपे जाणार आहे.
यामुळे या मालाला योग्य भाव मिळेल. तसेच या भागात रोजगार निर्मितीलाही बळ मिळेल. त्यातून या भागातील शेतकरी व नागरीकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे खासदार सुळे यांनी पत्रात म्हटले आहे.
या प्रकल्पांसाठी येणाऱ्या खर्चात केंद्र सरकार 90 (रु. 1857.69 लाख) तर उर्वरीत 10 टक्के (रु.206.4 लाख) वाटा राज्य सरकार उचलणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी गोयल यांच्याकडे केली.