या सरकारचे चाललेय तरी काय?: सुप्रिया सुळे

मिलिंद संगई
शुक्रवार, 25 मे 2018

बारामती (पुणे): महागाईने कहर केला आहे, सामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण बनले आहे, लोकांच्या मनात कमालीची खदखद आहे, तरीही सरकार काहीही करायला तयार नाही...या सरकारचे चालले आहे तरी काय? असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. आज (शुक्रवार) पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा सवाल उपस्थित केला.

बेरोजगारी वाढली, परकीय गुंतवणूक येत नाही, नवीन नोक-यांची निर्मिती होत नाही, शेतीमालाला हमी भाव मिळत नाही, दूध, साखरेला भाव नाही, शिक्षणाच्या बाबतीत रोज नवीन काहीतरी निर्णय होत आहेत, जे काही सरकारकडून सुरु आहे, ते फारस चांगल चाललेल नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडल.

समाजामध्ये आज कमालीची खदखद जाणवते आहे. इंधनाच्या दरवाढीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात होते तेव्हा काय बोलत होते आणि आज ते काय बोलत आहेत, या विषयाबाबत प्रचंड असंतोष असूनही सरकार अजिबात गंभीर नाही, असा आरोप करत भाजप सरकार केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जाहिरातबाजी हा एककलमी कार्यक्रम राबवित असल्याचे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रातही कुपोषण वाढले, नवीन रोजगारनिर्मिती झालेली नाही, महिलांवरील अत्याचार व हिंसाचारात कमालीची वाढ झाली. तुमची जनताच जर कुपोषित राहिली तर रस्ते बांधून करणार तरी काय, अशी विचारणा त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री हजार कोटी रुपये गुंतवणूकीच्या घोषणा करतात मात्र हा पैसा आणणार कोठून याची काहीच कल्पना कोणाला नाही. जलयुक्तशिवार, मागेल त्याला शेततळे, आदर्श गाव या योजनांच नेमक काय झाल, स्टार्ट अप, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र योजनांच नेमक काय झाल याचा पत्ताच नाही, सरकारच नेमक काय चाललय हेच समजायला मार्ग नाही असेही सुळे म्हणाल्या.

Web Title: supriya sule political attack on government in baramat