Supriya Sule : बारामती मुंबई रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी पाठपुरावा करु- सुप्रिया सुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya Sule

Supriya Sule : बारामती मुंबई रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी पाठपुरावा करु- सुप्रिया सुळे

बारामती : व्यापार व अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी बारामती ते मुंबई थेट रेल्वे सेवेची गरज आहे, या बाबत रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करु, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिली. बारामती इंडस्ट्रियल मनुफॅक्चरर्स असोसिएशनने थेट मुंबई रेल्वे सुरु करण्याबाबत आज सुळे यांना भेटून विनंती केली. ही मागणी रास्त असून आपण रेल्वे मंत्र्यांशी बोलू असे त्यांनी नमूद केले. अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, महादेव गायकवाड, मनोहर गावडे, संभाजी माने, नितीन जामदार आदी उपस्थित होते.

उद्योगव्यवसाय, शिक्षणाच्या निमित्त बारामतीत कामगार, विद्यार्थी व नागरिक यांची ये जा सुरु असते. बारामती एमआयडीसी क्षेत्रात 30 हजार कामगार काम करतात. मुंबईला यमित प्रवास करणाऱ्या उद्योजक व व्यावसायिकांची संख्या लक्षणीय असून सध्या केवळ एसटी बस सेवा उपलब्ध आहे. एसटी प्रवास वेळखाऊ असल्याने नाईलाजाने खाजगी वाहनाने खर्चिक व असुरक्षित प्रवास करावा लागतो. यासाठी बारामतीहून मुंबईला नियमित व थेट रेल्वेसेवा सुरू होणे अत्यंत आवश्यक झालेले आहे.

पुण्याहून मुंबई कडे सकाळी सुटणाऱ्या प्रगती एक्स्प्रेस किंवा डेक्कन क्विन रेल्वे गाडी बारामतीहून पहाटे पाचच्या दरम्यान सोडल्यास ती पुण्यात सकाळी सात वाजता पोहोचेल व तेथून मुंबईकडे रवाना होईल. यात पुणे व मुंबई येथे जाणा-यांची सोय होईल.

तसेच मुंबईहून सायंकाळी परतताना सदर गाडी बारामती मध्ये मुक्कामी आल्यास हजारो प्रवाशांना बारामती मुंबई बारामती थेट प्रवास करता येईल असा प्रस्ताव दिला आहे. यामुळे बारामती, दौंड व परिसरातील प्रवाशांना मुंबई प्रवासाची सुरक्षित, नियमित व किफायतशीर दरात माल वहातूकीची सोय उपलब्ध होईल. मुंबई थेट जोडली गेल्यावर उद्योग व्यवसायास निश्चित चालना मिळेल व रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होईल असा विश्वास धनंजय जामदार यांनी यावेळी व्यक्त केला.