
Pune News : वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसह सुप्रिया सुळेंनी केली कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी
कात्रज : कात्रज चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसह केली.
या पाहणी दौर्याच्या निमित्ताने सेवा रस्ते, कामात येणार्या इतर अडचणी व काम पूर्णत्वास जाण्यासाठी लागणारा वेळ याविषयी सविस्तर चर्चा करून अधिकार्यांना योग्य त्या सुचना करण्यात आल्या.
कात्रज-कोंढवा रस्त्याला हा पूल जिथे उतरतो त्या ठिकाणी परिसरतील नागरिकांना भेडसावणारी वाहतुक समस्या व त्यावर उपाय, तसेच कामाच्यावेळी कात्रज चौक येथे निर्माण होणार्या वाहतूक कोंडी संदर्भातही माजी नगरसेवक प्रकाश कदम, युवराज बेलदरे, प्रतीक कदम यांनी उपाय सुचविले.
यावर तत्काळ उपाययोजना करत कात्रज चौक ते नवले पूलादरम्यान असणार्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन सदर काम लवकरात लवकर पूर्ण करावे. त्याचबरोबर, यावेळी नवलेपूल ते कात्रज चौक रस्त्यावरील भुयारी मार्गाबाबतही आढावा घेऊन कामाला गती देण्याच्या सूचना सुळे यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या.
यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता महेश पाटील, शाखा अभियंता सलीम शेख, वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सागर पवार यांच्यासह माजी नगरसेवक प्रकाश कदम, काका चव्हाण, युवराज बेलदरे, सचिन दोडके उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी महामार्गाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर नवलेपूल ते कात्रज चौक रस्त्यावरील भुयारी मार्गाचे काम डिझाईन तयार करुन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच, कात्रज चौकातील उड्डाणपुलाचेही काम वेळेत पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. - सलीम शेख, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग