सुरेश शेवाळे यांच्यासह सहा जण भाजपमध्ये 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माजी महापौर सुरेश शेवाळे यांच्यासह विविध पक्षांतील सहा प्रमुख कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महापालिकेत सत्तेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पक्षांतराच्या घडामोडींना वेग येऊ लागला आहे.

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माजी महापौर सुरेश शेवाळे यांच्यासह विविध पक्षांतील सहा प्रमुख कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महापालिकेत सत्तेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पक्षांतराच्या घडामोडींना वेग येऊ लागला आहे.

 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरेश शेवाळे, विजय शेवाळे, दिलीप वेडे पाटील, कॉंग्रेसचे राघवेंद्र मानकर; तसेच गणेश भिंताडे, शैलेश बनसोडे यांनी मुंबईत प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, शहर संघटनमंत्री रवी अनासपुरे, आमदार भीमराव तापकीर, बाळा भेगडे आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

सुरेश शेवाळे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष आहेत, तर विजय शेवाळे हे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी आहेत. दिलीप वेडे पाटीलही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते, तर मानकर यांनी मागील महापालिका निवडणूक कॉंग्रेसकडून लढविली होती. भिंताडे हे धनकवडीतील बांधकाम व्यावसायिक असून, बनसोडे हे वडगाव शेरीतील कार्यकर्ते आहेत. 

मुलाच्या भाजप प्रवेशाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर म्हणाले, ""राघवेंद्र यांनी घेतलेल्या निर्णयाशी माझा संबंध नाही. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नव्हते. मी मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच आहे.'' 

दरम्यान, अन्य राजकीय पक्षांतील काही नगरसेवक, माजी नगरसेवक आणि काही कार्यकर्ते प्रवेशासाठी भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांचा प्रवेश लवकरच होईल, असे शहराध्यक्ष गोगावले यांनी सांगितले.

Web Title: Suresh shewale joint BJP