सर्जिकल सोसायटीतर्फे डॉ. लोहोकरे यांचा सन्मान

डी. के. वळसे पाटील
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

केवळ तोंडात छेद घेऊन दुर्बिणीद्वारे थायरॉईडची शस्त्रक्रिया केल्यास त्वचेवर कुठलाही प्रकारचा व्रण राहत नाही आणि रुग्ण लवकर पूर्ववत होतो. अशा शस्त्रक्रियेमध्ये निष्णात असलेले डॉ. आँगकुंग अनुवॉन्ग यांच्याकडून औपचारिक शिक्षण घेतले आहे. त्याचा फायदा झाला आहे. झालेल्या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.
- डॉ. नरेंद्र लोहोकरे

मंचर (पुणे) : येथील सिद्धकला हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांत डॉ. नरेंद्र लोहोकरे यांनी दुर्बिणीद्वारे व्रणविरहित थायरॉईड ग्रंथींच्या 11 शस्त्रक्रिया (ट्रान्सओरल एन्डोस्कोपिक थायरोइडेक्‍टोमी-व्हेस्टिब्युलर एप्रोच) केल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल पुणे सर्जिकल सोसायटीने घेतली आहे. त्यांनी सादर केलेल्या "द बेस्ट इनोव्हेटिव्ह व्हिडिओ'ला पुरस्कार देऊन पुणे येथे सोसायटीचे सचिव डॉ. संजय कोलते व अध्यक्ष डॉ. महेश ठोंबरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

डॉ. लोहकरे म्हणाले, ""वजन वाढणे, केस गळणे, थकवा, अपचन, नैराश्‍याने ग्रस्त कदाचित ही समस्या थायरॉइडच्या विकारामुळे उद्‌भवलेली असू शकते. धक्कादायक बाब म्हणजे अनेकांना याची पुसटशी कल्पनाही नसते. थायरॉइड ग्रंथींच्या शस्त्रक्रियेमध्ये सर्वसाधारणपणे टाक्‍याची शस्त्रक्रिया म्हणजेच गळ्यावर छेद घेऊन शस्त्रक्रिया केली जाते; परंतु अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्वचेवर व्रण दिसतात. रुग्ण पूर्ववत होण्यास जास्त काळ लागतो. रुग्णांच्या या समस्येचा विचार करून भारतात व जगात कोणते उपाय योजले जातात. याबाबतचा अभ्यास केला.''

Web Title: surgical society honor to dr narendra lohakare