सुर्वेंचे काव्य मनाला भिडणारे - कांबळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑगस्ट 2016

पिंपरी - ""कविवर्य नारायण सुर्वे यांच्या काव्यातील प्रत्येक शब्द हा जीवनाच्या रणभूमीवर लढता-लढता निर्माण झालेला होता. मानवी मनाला आरपार भिडणारे त्यांचे काव्य होते. मला आयुष्याने काही दिले नसते, फक्त सुर्वे यांचा स्पर्श दिला असता तरी माझे सोने झाले असते,‘‘ अशा हृदयस्पर्शी शब्दांमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी मंगळवारी विचार मांडले. 

चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर सभागृहात हा कार्यक्रम झाला. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांच्या हस्ते ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, मुरलीधर साठे उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर (नारायण सुर्वे स्नेहबंध), कवी अरुण पवार (नारायण सुर्वे काव्यप्रतिभा), उद्योजक पांडुरंग सांडभोर (राज्यस्तरीय उद्योगरत्न), नारायण सुर्वे साहित्य : सायमन मार्टिन, डी. के. शेख, शिवाजी सातपुते, विजय वडवेराव, संगीता अरबुने यांना विविध पुरस्कारांनी गौरविले. "नारायण सुर्वे संस्कारक्षम शाळा‘ हा सन्मान संचालिका प्रियांका बारसे यांनी स्वीकारला. प्रशांत केंदळे, आबा पाटील, अशोक थोरात, पीतांबर लोहार, रघुनाथ पाटील, सुरेश कंक यांना "आम्ही नारायण सुर्वे यांचे वारसदार कवी‘ या पुरस्काराने गौरविले.
 
कांबळे म्हणाले, ""सुर्वे यांचा मानसपुत्र होण्याचा मान मिळाला, हे मी माझं भाग्य समजतो. सुर्वे यांचे काव्य बंडखोर होते. त्यांचा श्‍वास आणि ध्यास कवितेतच सामावला होता. जगणं, लिहिणं आणि प्रत्यक्षात तसेच व्यक्त होणं, हे सुर्वे यांनाच साधले होते. त्यांनी स्व-कर्तृत्वाने इतिहासाच्या प्रत्येक पानावर स्वतःची मुद्रा उमटविली.‘‘
 
राजदत्त म्हणाले, ""पुरस्कारामुळे माझे मन भरून आले. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्यामध्ये नारायणाचा अंश आल्यासारखे वाटते.‘‘
वैद्य म्हणाले, ""साहित्य, कलेचा जीवनाशी, वास्तवाशी संबंध हवा. तो सुर्वे आणि त्यांच्या काव्याचा होता. साहित्याच्या मंचावर त्यांनी सामान्य माणसाची वेदना आणली.‘‘
 
पुरस्कारप्राप्त कवींनी कविता सादर केल्या. अकादमीचे प्रमुख कार्यवाह पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. कवी उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. कल्पना घारे यांनी आभार मानले.

Web Title: Survence verse mind grappling - kambale