"सूर्यकिरण'चा थरार आता सोशल मीडियावर 

योगिराज प्रभुणे
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे - शाळकरी मुलांना हवाई दलात रुजू होण्याची प्रेरणा मिळण्यासाठी "सूर्यकिरण' या लढाऊ विमानांच्या तुकडीने थेट "सोशल मीडिया'वर भरारी घेतली आहे. सूर्यकिरण विमानांच्या देशातील कानाकोपऱ्यांत होणाऱ्या सर्व चित्तथरारक कसरती आता "फेसुबक' आणि "इन्स्टाग्राम'वर नागरिकांना पाहता येतील. 

पुणे - शाळकरी मुलांना हवाई दलात रुजू होण्याची प्रेरणा मिळण्यासाठी "सूर्यकिरण' या लढाऊ विमानांच्या तुकडीने थेट "सोशल मीडिया'वर भरारी घेतली आहे. सूर्यकिरण विमानांच्या देशातील कानाकोपऱ्यांत होणाऱ्या सर्व चित्तथरारक कसरती आता "फेसुबक' आणि "इन्स्टाग्राम'वर नागरिकांना पाहता येतील. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

सूर्यकिरण ही भारतीय हवाई दलातील एक तुकडी. नऊ विमानांची ही तुकडी आकाशात भरारी घेत पाहणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका चुकेल, अशा चित्तथरारक कसरती करण्यात आघाडीवर असते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 135 व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनाच्या वेळी सूर्यकिरणने केलेल्या कसरतींनी दाद मिळविली. आकाशात भरारी घेत "तेजस' आणि "मिग 29' अशा हवाई दलाच्या ताफ्यातील लढाऊ विमानांच्या प्रतिकृती करत त्यांना सलामी दिली. त्याचवेळी "त्रिशूळ', "वाइन ग्लास' असे आकारही या नऊ विमानांनी साकारले. 

सूर्यकिरण विमानांच्या बहुसंख्य कसरती या हवाई दलाच्या केंद्रावर होतात. या कसरती देशातील सर्वच सामान्य नागरिकांना पाहता येणे शक्‍य होत नाही, त्यामुळे सूर्यकिरणच्या कसरती आता सोशल मीडियावर "शेअर' केल्या जाणार, त्यासाठी फेसबुक पेजही तयार करण्यात आले आहे. 

विद्यार्थी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी भारतीय हवाई दल हा प्रयोग करत आहे. यातून प्रभावित झालेले विद्यार्थी हवाई दलात भरती होतील, असा विश्‍वास आहे. त्यासाठी त्याचा संदेश या सोशल मीडियातून देण्यावर भर राहणार असल्याची माहिती सूर्यकिरणच्या वैमानिकांनी दिली. 

याबाबत बोलताना विंग कमांडर विजय शेळके म्हणाले, ""सूर्यकिरण विमानांच्या कसरतींबद्दल लोकांपर्यंत माहिती पोचावी, यासाठी सोशल मीडियावर सातत्याने "अपडेट' टाकले जातील. कसरती कुठे होणार आहेत, याची माहिती त्यात असेल. तसेच, त्या कसरतींना नागरिकांनी कसा प्रतिसाद दिला, याचे फोटो आणि व्हिडिओ यात प्रसिद्ध केले जातील. नागरिकांनी सूर्यकिरणच्या पथकातील वैमानिकांशी साधलेला संवाद असेल किंवा त्याच्या प्रतिक्रिया असतील, हे सर्व "अपडेट' नागरिकांना सोशल मीडियातून कळतील.'' 

सूर्यकिरणबद्दल... 
- सूर्यकिरण विमानांचा तळ हा कर्नाटकातील बिदर येथे आहे. 
- हवाई कसरतींसाठी या विमानांचा वापर केला जातो. 
- 1996 ते 2011 या पहिल्या टप्प्यात या विमानांनी हवाई दलासाठी कार्य केले. 
- 2015 नंतर यात सुधारणा करून विमानांच्या कसरती सुरू आहेत. 
- या ताफ्यात पूर्वी चार विमाने होती, नंतर सहा झाली. आता नऊ विमानांचा ताफा आहे. 
- "सदैव सर्वोत्तम' या आदर्शावर हवाई दलाच्या या तुकडीचे कार्य सुरू आहे. 

Web Title: Suryakiran fighter plane thrills now on social media